कर्करोगाला बालवयातच प्रतिबंधाचे कवच, १२५४ मुलींना एचपीव्ही लस

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गर्भाशयमुखाचा कर्करोग रोखण्यासाठी जिल्ह्यात किशोरवयीन मुलींच्या एचपीव्ही लसीकरणाला वेग आला आहे. मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत आतापर्यंत जिल्ह्यात १,२५४ मुलींना एचपीव्हीची लस देण्यात आली आहे.
१४ वर्षे पूर्ण ते १५ वर्षे ९० दिवसांपेक्षा कमी वयाच्या मुलींना ही लस दिली जात आहे. जिल्ह्यात मोहिमेसाठी एकूण ८६६ लसीकरण सत्रे नियोजित असून त्यापैकी आतापर्यंत ५४८ सत्रे पूर्ण झाली आहेत. विशेषतः आदिवासी व दुर्गम भागातील पात्र मुलींपर्यंत लसीकरणाची सुविधा पोहोचविण्यावर आरोग्य विभागाचा भर आहे.
जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून लसीकरण सत्रे घेण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या समन्वयातून मोहीम राबविण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरणाच्या माध्यमातून मुलींना भविष्यात कर्करोगापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
तालुकानिहाय लसीकरण -
तालुकानिहाय आकडेवारीत धानोरा २९४, आरमोरी २२७, सिरोंचा १६८ आणि चामोर्शी ११० मुर्लीचे लसीकरण झाले आहे. त्यापाठोपाठ कोरची ९७, अहेरी ७५, भामरागड ६४, गडचिरोली ५८, कुरखेडा ५२, एटापल्ली ५१, मुलचेरा ३४ आणि देसाईगंज २४ मुलींना लस देण्यात आली आहे.
लसीकरणाचे वेळापत्रक, केंद्रांची माहिती घ्यावी -
जिल्ह्यात पात्र मुलींचे १०० टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यादृष्टीने पात्र मुलींनी लसीकरण करून घ्यावे. २ पात्र मुलींच्या पालकांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी किंवा शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधून लसीकरणाचे वेळापत्रक व केंद्राची माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.




Petrol Price




