कोरोनाच्या महामारीत गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना प्रतिव्यक्ती ५ किलो तांदूळ मोफत मिळणार


- जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना धान्य वाटपाबाबत केल्या सूचना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
सध्या देशात, राज्यात व जिल्ह्यात सर्वत्र कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या लाॅकडाऊनच्या काळात सर्व कामधंदे बंद असल्याने अनेक गरजू व गरीब नागरिकांना दोन वेळच्या भोजनाची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या लक्षात घेऊन शासनाने शिधापत्रिका धारकांना नियमित धान्याव्यतिरिक्त प्रतिव्यक्ती ५ किलो तांदूळ मोफत देण्याची घोषणा केली. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील लोकांना मोफत धान्याचा लाभ मिळत नसल्याने गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना नागरिकांना मोफत धान्याचा लाभ देण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील लोकांना सुद्धा मोफत धान्य वाटप करण्यात येणार आहे. नियमित शिधापत्रिका धारकांना एप्रिल, मे व जून या तीन महिन्याचे धान्य पैसे देऊन मिळत आहेत. मात्र कोरोना विषाणूंच्या महामारीत शिधापत्रिका धारकांना नियमित धान्याव्यतिरिक्त प्रतिव्यक्ती ५ किलो याप्रमाणे मोफत तांदूळ देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात अद्यापही मोफत धान्य वाटपाचा साठा पोहचला नसल्याने मोफत तांदळाच्या लाभापासून नागरिक वंचित असल्याची बाब लक्षात आली. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी काल, ८ एप्रिल रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना धान्य पुरवठा करून लोकांना प्रतिव्यक्ती ५ किलो याप्रमाणे मोफत तांदूळ वाटप करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सुद्धा कंकडालवार यांच्या सूचनांचे पालन करण्याचे व सर्व तालुक्यांना तत्काळ धान्य पुरवठा करून मोफत धान्य वाटप करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आता कंकडालवार यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यातील शिधापत्रिका धारकांना प्रतिव्यक्ती ५ किलो याप्रमाणे मोफत तांदळाचा लाभ मिळणार आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-04-09


Related Photos