महत्वाच्या बातम्या

 दत्त जयंती विशेष


१. दत्त या शब्दाचा अर्थ

दत्त म्हणजे (निर्गुणाची अनुभूती) दिलेला. दत्त म्हणजे आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे असा. जन्मापासूनच दत्ताला निर्गुणाची अनुभूती होती, तर साधकांना ती यायला कित्येक जन्म साधना करावी लागते. यावरून दत्ताचे महत्त्व लक्षात येईल.


२. अन्य काही नावे

अवधूत

१. अवधूत चिन्तन श्री गुरुदेव दत्त । असा जयघोष दत्तभक्त करीत असतात. त्याचा अर्थ असा – अवधूत म्हणजे भक्त. भक्तांचे चिंतन करणारे, म्हणजे भक्तांचे हितचिंतक, श्री गुरुदेव दत्त.


२. संकल्प-विकल्परहित । शुद्ध सर्वांगी विभूत ।

यालागीं बोलिजे अवधूत । येर्‍हवीं विख्यात ब्राह्मणु ।।

सभोंवता समस्तु । प्रपंच निजबोधें असे धूतु ।

यालागीं बोलिजे अवधूत । येर्‍हवीं विख्यात ब्राह्मणु ।।

अहं धुवील तो अवधूत । तोचि योगी तोचि पुनीत ।

जो का अहंकारे ग्रस्त । तोचि पतित जन्मकर्मी ।। – श्री एकनाथी भागवत ७:२७०-२७२


भावार्थासहित अर्थ : सर्व संकल्प-विकल्परहितपणाची विभूती त्याने सर्वांगाला लावलेली होती. म्हणूनच त्याला अवधूत असे म्हणावयाचे; एरव्ही तो ब्राह्मणच होता. सभोवती असलेला सारा प्रपंच त्याने आत्मबोधाने धुऊन टाकला होता; म्हणूनही त्याला अवधूत म्हणावे. एरव्ही तो एक विख्यात ब्राह्मण होता. अहं जो धुतो तो अवधूत, तोच योगी आणि तोच पुनीत होय. जो अहंकारग्रस्त असतो तोच जन्मकर्मामध्ये पतित होतो म्हणून समजावे.

दिगंबर

दिक् एव अंबरः । दिक् म्हणजे दिशा हेच ज्याचे अंबर म्हणजे वस्त्र आहे असा, म्हणजे एवढा मोठा, सर्वव्यापी.

दत्तात्रेय

दत्तात्रेय हा शब्द दत्त + अत्रेय असा बनला आहे. दत्ताचा अर्थ मुद्दा १ मध्ये दिला आहेच. अत्रेय म्हणजे अत्रीऋषींचा मुलगा.

३. मूर्तीविज्ञान

प्रत्येक देवता हे एक तत्त्व आहे. हे तत्त्व युगानुयुगे असतेच. देवतेचे तत्त्व त्या त्या काळाला आवश्यक अशा सगुण रूपात प्रगट होते, उदा. भगवान श्रीविष्णूने कार्यानुमेय धारण केलेले नऊ अवतार. मानव कालपरत्वे देवतेला विविध रूपांत पुजायला लागतो. दत्तपूजेसाठी सगुण मूर्तीऐवजी पादुका आणि औदुंबरवृक्ष यांची पूजा करतात. पूर्वी मूर्ती बहुदा एकमुखी असायची. हल्ली त्रिमुखी मूर्ती जास्त प्रचलीत आहे. ख्रिस्ताब्द १००० च्या सुमारास दत्ताची मूर्ती त्रिमुखी झाली.

दत्त हा गुरुदेव आहे. दत्तात्रेयांना परमगुरु मानले आहे. त्यांची उपासना गुरुस्वरूपातच करावयाची असते. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदत्त असा त्यांचा जयघोष करतात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ही नामधून आहे.

४. दत्तजयंती

एक सांप्रदायिक जन्मोत्सव. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. 

५. कार्य आणि वैशिष्ट्ये

अ. वर्णाश्रमधर्माची प्रतिष्ठा राखणारा

आ. गुरुतत्त्वाचा आदर्श आणि योगाचा उपदेष्टा (शांडिल्योपनिषद्) : दत्ताचे अलर्क, प्रल्हाद, यदु, सहस्रार्जुन, परशुराम वगैरे शिष्य प्रसिद्ध आहेत.

इ. तंत्रशास्त्राचा आचार्य (त्रिपुरासुंदरीरहस्य)

ई. उन्नतवत वर्तनाचा, (कृष्णासारखाच) विधीनिषेध नसलेला (मार्कंडेयपुराण)

उ. स्वेच्छाविहारी आणि स्मर्तृगामी (स्मरण करणार्‍याला सत्वर भेटणारा)

ऊ. दत्त आणि शिव हे देव वैराग्य देणारे आहेत. (बाकीचे देव इतर सर्व देतात.)

ए. पूर्वजांच्या त्रासांपासून मुक्ती देणारा

ऐ. वाईट शक्तींच्या त्रासांचे निवारण करणारा


६. समन्वयाचे प्रतीक

अ. शैव आणि वैष्णव : या दोन्ही संप्रदायांना गुरुरूपामुळे दत्त आपला वाटतो.

आ. हिंदु आणि मुसलमान : मुसलमानांप्रमाणेच संगीताला व धुपाला दत्तपूजेत महत्त्व असते.


७. नित्यक्रम

दत्त दररोज खूप भ्रमण करीत. त्यांच्या नित्य दिनक्रमातील कृती आणि त्या कृती करावयाचे त्यांची स्थाने पुढे देत आहोत.

अ. निवास : मेरुशिखर

आ. प्रातःस्नान : वाराणसी (गंगातीर)

इ. आचमन : कुरुक्षेत्र

ई. चंदनाची उटी लावणे : प्रयाग (पाठभेद – तिलक लावणे : पंढरपूर)

उ. प्रातःसंध्या : केदार

ऊ. विभूतीग्रहण : केदार

ए. ध्यान : गंधर्वपत्तन (पाठभेद – योग : गिरनार, सौराष्ट्र, गुजरात.)

ऐ. दुपारची भिक्षा : कोल्हापूर

ओ. दुपारचे जेवण : पांचाळेश्वर, जिल्हा बीड, मराठवाडा येथे गोदावरीच्या पात्रात.

औ. तांबूलभक्षण : राक्षसभुवन, जिल्हा बीड, मराठवाडा.

क. विश्राम : रैवत पर्वत

ख. सायंसंध्या : पश्चिम सागर

ग. पुराणश्रवण : नरनारायणाश्रम (पाठभेद – प्रवचन अणि कीर्तन ऐकणे : नैमिषारण्य, बिहार)

घ. निद्रा : माहूरगड ( सह्य पर्वत, जिल्हा नांदेड) 

यांतील २, ८ आणि १४ ही स्थाने प्रसिद्ध आहेत.


संकलक : श्रीमती विभा चौधरी

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ दत्त

संपर्क : 7620831487





  Print






News - Editorial




Related Photos