महत्वाच्या बातम्या

 तेलंगणातील रुग्णालयातून लाखोंचे व्हेंटिलेटर लंपास : चंद्रपूर एलसीबीने आरोपीला केले जेरबंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथील राजीव गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था (रिम्स) शासकीय रुग्णालयातून लाखो रुपये किमतीचे चार व्हेंटिलेटर चोरीला गेल्याच्या घटनेचा चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या चोरीप्रकरणातील मुख्य संशयित आरोपीला चंद्रपुरातून ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला तेलंगणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

३० ऑक्टोबर २०२६ रोजी आदिलाबाद येथील रिम्स शासकीय रुग्णालयातील आरआयसीयू तसेच सारी आणि टीबी वॉर्डमधून प्रत्येकी १५ लाख रुपये किमतीचे चार व्हेंटिलेटर चोरीला गेले होते. या चारही व्हेंटिलेटरची एकूण किंमत सुमारे १ कोटी २० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. या घटनेप्रकरणी आदिलाबाद-२ टाऊन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७५१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तेलंगणा पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केले. तसेच गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे चोरीतील संशयित चंद्रपूर शहरातील अंचलेश्वर गेट परिसरात वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून सज्जन वसंत मोटे (वय ४५), रा. अंचलेश्वर वार्ड, चंद्रपूर याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने सदर चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती आहे. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला पुढील तपास आणि चोरीच्या व्हेंटिलेटरच्या जप्तीसाठी तेलंगणा पोलिसांच्या पथकाकडे सुपूर्द करण्यात आले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक योगेश हिवसे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, सुनील गौरकार, पोलीस हवालदार सतीश अवथरे, इम्रान खान, संदीप कामडी, हिरालाल गुप्ता, लालू यादव, पोलीस अंमलदार शशांक बादामवार, किशोर वाकाटे यांनी केले.





  Print






Related Photos