महत्वाच्या बातम्या

 मरेखटच्या भीतीने संसाराची लूट : भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकून महिलेने गमावले ९८ हजार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : पतीला मरेखट लागल्याची भीती दाखवत पूजा, औषधोपचार आणि विविध विधींच्या नावाखाली एका अनोळखी व्यक्तीने गांगलवाडी येथील ३५ वर्षीय महिलेची तब्बल ९८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारात महिलेने ३८ हजार रुपये रोख आणि सुमारे १२ ग्रॅम सोन्याचे दागिने त्या व्यक्तीच्या हवाली केले. कष्टाने उभ्या केलेल्या संसारासाठी साठवलेली रक्कम आणि दागिने गेल्याने महिलेवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.

संध्या मनोहर मशाखेत्री ३५ वर्षे, रा. गांगलवाडी, ता. ब्रह्मपुरी यांनी ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्या पती मनोहर मशाखेत्री, मुलगी सुहानी १६ वर्षे आणि मुलगा सुरज १४ वर्षे यांच्यासह राहतात. पती भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. घराचे बांधकाम सुरू असल्याने महिलेने बचत गटातून ५० हजार रुपये व्याजाने घेतले होते. तसेच घरातील धान विक्रीतून मिळालेले पैसेही त्यांनी घरी ठेवले होते.

१९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती गावात भिक्षा मागण्यासाठी फिरत होत्या. त्यापैकी एक व्यक्ती संध्याबाई यांच्या घरी आली. पांढरा फुलशर्ट, काळी लुंगी, लाल फेटा, खांद्यावर झोळी, गळ्यात काळा दुपट्टा, हातात पुस्तक आणि मोरपिसाचा झाडू अशा वेशातील या व्यक्तीने प्रथम दहा रुपयांची भिक्षा मागितली. त्यानंतर घरात कोण कोण आहे, अशी विचारणा करून त्याने पती दारू पिऊन झोपले असल्याची आणि मुले शाळेत गेल्याची माहिती घेतली.

त्यानंतर या व्यक्तीने घराला किडा लागला असून पूजा करावी लागेल, असे सांगून महिलेच्या मनात भीती निर्माण केली. पाणी, अगरबत्ती, तांदूळ आणि धागा आणण्यास सांगून त्याने विविध विधी करवून घेतले. धाग्याला पाच गाठी बांधून त्या तोडण्यास सांगितले. धाग्यावर दहा रुपये ठेवून तो पतीच्या उशाखाली ठेवण्यास सांगितले. त्यानंतर धागा पुन्हा आणून पतीच्या हाताला बांधण्यास सांगितले. मोरपिस आणि राख देत ती राख पाण्यात मिसळून पती व मुलांच्या अंगावर टाकण्यास सांगितले.

पूजा झाल्याचे सांगून त्याने आठ हजार रुपये मागितले. घाबरलेल्या महिलेने त्याला घरातील आठ हजार रुपये दिले. त्यानंतर त्याने तिचा मोबाईल क्रमांक घेतला आणि तेथून निघून गेला. त्याच रात्री संबंधित व्यक्तीने फोन करून घराला ‘मरेखट’ लागल्याचे सांगितले. ते दूर करण्यासाठी औषध घ्यावे लागेल, अशी भीती दाखवत ब्रह्मपुरी येथील धन्वंतरी आयुर्वेदिक दुकानाचा मोबाईल क्रमांक दिला. महिलेने दुकानदाराशी संपर्क साधल्यानंतर औषध महाग असल्याचे सांगून पैसे घेऊन येण्यास सांगण्यात आले. २० सप्टेंबर रोजी महिलेने ब्रह्मपुरी येथील वडसा रोडवरील दुकानातून औषध घेतले.

२७ सप्टेंबर रोजी पुन्हा फोन करून त्याच दुकानातून दुसरे औषध घेण्यास सांगण्यात आले. त्यानुसार महिला दुकानात गेली असता तिला दोन औषधांच्या बाटल्या देण्यात आल्या. त्यानंतर ती औषधे संबंधित व्यक्तीच्या सांगण्याप्रमाणे पतीला देत राहिली. मात्र, या प्रकाराने संशयित व्यक्ती थांबला नाही. तो वारंवार फोन करून घरात पुन्हा पूजा करायची असल्याचे सांगत होता. पूजेसाठी सोने आणि ५५ हजार रुपये लागतील, असे सांगून त्याने महिलेवर मानसिक दबाव निर्माण केला.

अखेर १ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास महिला आपल्या मुलासोबत तळोधी गावातील पाण्याच्या टाकीजवळ गेली. तेथे संबंधित व्यक्ती मोटारसायकलवरून आला. महिलेने त्याच्याकडे ३० हजार रुपये रोख तसेच सहा ग्रॅम सोने, तीन ग्रॅमच्या दोन अंगठ्या आणि तीन ग्रॅमची विरा असे एकूण सुमारे १२ ग्रॅम सोन्याचे दागिने दिले.

हे पैसे आणि सोने नदीवर नेऊन पूजेत ठेवून सायंकाळी परत आणतो, असे त्याने सांगितले. तसेच घरी देवघरात खड्डा खोदून परत मिळालेले सोने त्यात ठेवण्यास सांगितले. त्यानंतर घरात माल येईल, अशी भुलथाप देत तो मोटारसायकलवरून निघून गेला. मात्र, तो परतलाच नाही.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने ब्रह्मपुरी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पूजा आणि औषधांच्या नावाखाली भीती निर्माण करून आपल्याकडून ३८ हजार रुपये रोख आणि अंदाजे ६० हजार रुपये किमतीचे १२ ग्रॅम सोन्याचे दागिने घेण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

अंधश्रद्धा आणि भीतीचा आधार घेत नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढून आर्थिक फसवणूक करण्याचा हा प्रकार समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यासाठी ब्रह्मपुरी पोलिस तपास करीत आहेत.





  Print






Related Photos