शहीद बाबुराव शेडमाके यांचा ऐतिहासिक लढा वर्तमानातही प्रेरक


- लेखिका उषाकिरण आत्राम यांचे प्रतिपादन : चंद्रपुरात प्रथमच रंगली गोंडियन संस्थेची अनोखी व्याख्यानमाला
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांनी १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात ब्रिटिश सत्तेविरोधात दिलेला लढा केवळ ऐतिहासिक घटना नसून, तो आजच्या काळातही अन्याय व शोषणाविरुद्ध लढण्यासाठी अत्यंत प्रेरक आहे. गोंडवाना भूमीचा स्वाभिमान, जल-जंगल-जमिनीचे हक्क व आदिवासी संस्कृतीच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाऊ देता कामा नये. त्यांचा हा विद्रोही जागर नव्या पिढीला दिशा देणारा आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका उषाकिरण आत्राम यांनी केले. गोंडियन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्थेच्या वतीने रविवारी १ चंद्रपुरातील तुकूम येथील मातोश्री विद्यालय सभागृहात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके: गोंडवाना स्वाभिमानाचा विद्रोही जागर या विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थान गोंडी, आदिवासी कला, साहित्य व संस्कृतीचे अभ्यासक राजेश मडावी यांनी भूषविले.
त्यांनी उषाकिरण आत्राम व डॉ. योगेश दुधपचारे यांच्या व्याख्यानांतील शक्तीस्थळांवर भाष्य करून शहीद शेडमाके यांच्या योगदानाची स्थानिक नव्हे तर आता अखिल भारतीय परिप्रेक्ष्यातून पुनर्रमांडणी करण्याची गरज अधोरेखित केली. प्रास्ताविक सुधाकर कन्नाके, तर सूत्रसंचालन रमेश कुंभरे यांनी केले. विजय तोडासे यांनी आभार मानले. आयोजनासाठी ज्योतीराव गावडे, राजू परचाके, प्रकाश कुंभरे, मनोज आत्राम, संजय तोडासे, निलेश कुमरे, सारंग कुमरे, लता शेडमाके, अश्रका कुमरे आदींनी सहकार्य केले.
क्रांतीकार्याचा सखोल अभ्यास व्हावा-डॉ. योगेश दुधपचारे -
क्रांतीवीर बाबुराव शेडमाके: स्वातंत्र्यलढ्यातील योगदान व वर्तमान स्थिती या विषयाच्या अनुषंगाने अभ्यासक डॉ. योगेश दुधपचारे यांनी शहीद शेडमाके यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील अतुलनीय योगदानावर प्रकाश टाकला. चंद्रपूर-गडचिरोली प्रांतातून ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारून त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. परंतु, मुख्य प्रवाहाला इतिहासलेखनात त्यांना हवे तसे स्थान मिळाले नाही, अशी खंत व्यक्त केली. वर्तमानात आदिवासी समाजास मोरील आव्हाने, हक्क व अस्तित्वाची लढाई समजून घेण्यासाठी त्यांच्या क्रांतीकार्याचा सखोल अभ्यास करणे अत्यावश्यक असल्याचे मत नमुद केले.
व्याख्यानमाला आता दरवर्षी होणार -
गोंडियन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्थेच्या वतीने क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्या पराक्रमाचा गौरवशाली वारसा नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ही विशेष व्याख्यानमाला यापुढे दरवर्षी आयोजित करण्याचा संकल्प संस्थेने केला आहे. याद्वारे जागृती व आदिवासी संस्कृतीच्या रक्षणाचा हा उपक्रम पुढे नेला जाईल, अशी घोषणा करण्यात आली. फोटो कॅप्शन : लेखिका उषाकिरण आत्राम यांना सन्मानपत्र प्रदान करताना आयोजक व उपस्थित डॉ. योगेश दुधपचारे, राजेश मडावी.




Petrol Price




