शहीद रवी चौधरी यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या वाचनालयाचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन!


- पोलीस दादालोरा खिडकी उपक्रमातून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी दिशा; विद्यार्थ्यांशी संवाद साधत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पोलीस दादालोरा खिडकी या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत शहीद रवी चौधरी यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या वाचनालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव मा. राजेश अग्रवाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले. या उपक्रमामुळे दुर्गम व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना अभ्यास, वाचन आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
या उद्घाटनप्रसंगी गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक योगेश कुमार गुप्ता, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा (भा.प्र.से.), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास लक्ष्मण गाडे (भा.प्र.से.) तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश (भा.पो.से.) यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस स्टेशन असरअल्लीचे प्रभारी अधिकारी सपोनि युवराज घोडके, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक प्रफुल भोयर, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक बळीराम बुडसे, जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांशी संवाद; स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचे आवाहन -
वाचनालयाच्या उद्घाटनानंतर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची, आवडी-निवडींची तसेच भविष्यातील ध्येयांची माहिती घेतली. नियमित वाचनाची सवय लावा, शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत येण्याचे स्वप्न बाळगा, असे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या -
यावेळी मुख्य सचिवांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. शासनाच्या विविध योजना व विकासकामांचा लाभ दुर्गम भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने नागरिकांशी साधलेला हा संवाद महत्त्वपूर्ण ठरला.
पोलीस दादालोरा खिडकी उपक्रमाचे विशेष कौतुक -
गडचिरोलीसारख्या दुर्गम व अतिदुर्गम भागात पोलीस दल केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यापुरते मर्यादित न राहता शिक्षण, आरोग्य, जनजागृती आणि सामाजिक विकासासाठीही पुढाकार घेत आहे, ही अत्यंत कौतुकास्पद बाब असल्याचे मुख्य सचिवांनी नमूद केले. पोलीस दादालोरा खिडकी उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
शहीद रवी चौधरी यांच्या नावाने सुरू करण्यात आलेले हे वाचनालय ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे केंद्र ठरणार असून, त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला नवी प्रेरणा देणार आहे. शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्याचा आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. एकंदरीत, पोलीस दादालोरा खिडकी उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेले हे वाचनालय केवळ पुस्तकांचे दालन नसून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग प्रशस्त करणारे प्रेरणास्थान ठरणार आहे.




Petrol Price




