३१ डिसेंबर २०२७ पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करणारच!


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला १२१ वर्षांचा इतिहास असून, आता ही मागणी निर्णायक टप्प्यावर नेण्याचा निर्धार विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे. ३१ डिसेंबर २०२७ पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती होणारच, असा ठाम संकल्प चंद्रपुरातील मेळाव्यात करण्यात आला. ना दान चाहिए, ना अनुदान चाहिए, हमे तो सिर्फ विदर्भ राज्य चाहिए, अशी घोषणा देत आंदोलनाची सूत्रे तरुण पिढीकडे सोपविण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या मिशन २०२७ अंतर्गत चंद्रपुरातील जिजाऊ लॉन येथे आयोजित मेळाव्याचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक देशोन्नतीचे प्रबंध संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांच्या हस्ते झाले. माजी आमदार ॲड. वामनराव चटप अध्यक्षस्थानी होते. यावेळी समितीचे उपाध्यक्ष अरुण केदार, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा प्रा. मंजुषा तिरपुडे, युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासुरकर, ॲड. दीपक चटप, माजी राज्यमंत्री डॉ. रमेश गजबे यांच्यासह विदर्भातील विविध जिल्ह्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मेळाव्यात विदर्भाच्या विकासातील अनुशेषाचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित करण्यात आला. सिंचन क्षेत्रातील ६० हजार कोटी रुपये आणि इतर क्षेत्रांतील १५ हजार कोटी रुपये असा एकूण ७५ हजार कोटींचा अनुशेष असल्याचा दावा करण्यात आला. विदर्भात मंजूर झालेली १३१ धरणे अपूर्ण असून, १४ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्टही पूर्ण झालेले नाही. तसेच विदर्भातील ४७ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा करत बेरोजगारी, कुपोषण, बालमृत्यू, स्थलांतर आणि प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले.
महाराष्ट्रावरील वाढते कर्ज आणि आर्थिक तूट लक्षात घेता विदर्भाचा अनुशेष भरून काढणे शक्य नसल्याची भूमिका नेत्यांनी मांडली. शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची कायमस्वरूपी सोडवणूक स्वतंत्र विदर्भ राज्यातूनच होऊ शकते. त्यामुळे स्वतंत्र राज्याच्या निर्मितीसाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. मेळाव्याला विदर्भप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माता महाकालीचे आशीर्वाद घेऊन सुमारे पाचशे मोटारसायकलस्वारांची रॅली गांधी चौक आणि प्रियदर्शनी चौक मार्गे जिजाऊ लॉन येथे दाखल झाली. महिला, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मेळाव्याचे प्रास्ताविक मुन्ना आवळे, संचालन मितीन भागवत यांनी केले, तर सुरेश शंभरकर यांनी आभार मानले.




Petrol Price




