अवैध दारू व्यवसायिकांकडूनच होत आहे दारूबंदी कायम ठेवण्याची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मूल :
दारूबंदी ही समाजहिताची असून, दारूबंदीमुळे अनेक महिलांना दिलासा मिळाला आहे. अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून सुरक्षित झाले असून, अनेकजण दारूच्या व्यसनापासून मुक्त झाले आहे. त्यामुळे दारूबंदी कायम ठेवावी, अशी मागणी दारूबंदीनंतर दारूचा अवैध व्यवसाय करणाऱ्या मंडळींनीच केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असून, दारूच्या नशेत वाहन चालविल्यामुळे अनेक अपघात घडत असतात. या घटनांवर आळा घालण्यासाठी जिल्ह्यात दारूबंदी करावी, या मागणीची दखल घेऊन शासनाने जिल्ह्यात दारूबंदी जाहीर केली. तेव्हा मोजक्या मंडळींना वगळल्यास समाजातील बहुतांश
मंडळींनी दारूबंदीचे स्वागत केले. सुरुवातीचे काही दिवस दारूबंदीची कडक अंमलबजावणी सुरू होती. दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात दारूबंदी कायद्याचे
उल्लंघन आणि पोलिसांच्या डोळ्यात धूळ झोकून दारूची आयात व विक्री करणाऱ्यांवर आळा घालताना एका पोलीस अधिकाऱ्याला जीव गमवावा लागला. तर अनेक पोलीस कर्मचारी अपघातामध्ये जखमी झाले आहेत. असे असतानाही पोलीस प्रशासन अवैध दारूविक्रीवर आळा घालण्यासाठी आजही प्रयत्नरत आहेत.
पोलिसांनी आजपर्यंत मोठ्या प्रमाणात अवैध दारूसाठा, दारूची वाहतूक करणारी वाहने आणि व्यक्तींना ताब्यात घेऊन कारवाई केली. परंतु, दारूबंदी
कायद्याची ऐशीतैशी करून दारूबंदी योजनेला हरताळ फासणाऱ्या व्यक्तींविरुद्ध पाहिजे त्या प्रमाणात कठोर कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे प्रमाण वाढीस लागले असून, आज जिल्ह्यातील प्रत्येक गाव आणि शहरात बेभाव दराने दारू मिळत असल्याने सध्यास्थितीत शासनाच्या दारूबंदी योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. शासनमान्य दारूची दुकान बंद झाल्याने शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, दुसरीकडे मात्र अवैध दारू विक्रीमुळे अनेकांना 'सोन्याची अंडी देणारी कोंबडी' सापडली आहे. पूर्वाश्रमीच्या दारू व्यावसायिकांसोबत अनेक राजकीय मंडळी दारूबंदी रद्द करण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे दारूबंदीसाठी प्रयत्न करणारे सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय मंडळी दारूबंदी कायम ठेवावी, यासाठी शासनदरबारी आग्रही आहेत. दोन बाजुला दोन विचारांची मंडळी मागणीच्या पूर्ततेसाठी रेटून असताना दारूबंदीनंतर दारूचा अवैध व्यवसाय करणारी मंडळीसुद्धा जिल्ह्यात दारूबंदी कायम ठेवावी म्हणून मोर्चा लढवित आहेत. दारूबंदीमुळे तालुक्यातील मूल शहर वगळता राजोली, बेंबाळ, नांदगाव, चिरोली आणि जुनासूर्ला येथील अधिकृत दारू दुकाने बंद झाल्यानंतर प्रत्येक गावात दारूचा व्यवसाय करणारे स्वत:ला सामाजिक कार्यकर्ता म्हणवून पुढाकार घेत निवेदन तयार करून त्यावर निवडक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या, अंगठे घेऊन दारूबंदी कायम ठेवावी, अशी मागणी करू लागले आहेत. दारूबंदी उठवल्यास आपल्या आमदनीवर पाणी फेरल्याशिवाय राहणार नाही, या भीतीपोटी मूल येथील काही मंडळी त्यांना मार्गदर्शन करीत असून, दारूबंदीसमर्थकांच्या माध्यमातून शासनावर दबाव आणत असल्याची चर्चा आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2020-03-07


Related Photos