महत्वाच्या बातम्या

 एसटीच्या प्रवासात डिजिटल क्रांती : यूपीआय व्यवहारांतून २३.२१ कोटींची उलाढाल


- भंडारा विभागातील सहा आगारांत डिजिटल पेमेंटची सुविधा; ८३६ अँड्रॉइड तिकीट मशीनद्वारे प्रवाशांना क्यूआर कोड स्कॅन करून भाडे भरण्याची सोय

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासात डिजिटल पेमेंटचा वापर वाढत असून, तिकीट काढण्यासाठी सुट्ट्या पैशांची जुळवाजुळव करण्याची प्रवाशांची कसरत आता कमी झाली आहे. रोख रक्कम जवळ नसली किंवा सुट्टे पैसे उपलब्ध नसले, तरी प्रवाशांना तिकीट काढता यावे, यासाठी एसटी महामंडळाने यूपीआयद्वारे पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भंडारा विभागात या सुविधेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत १८ लाख ८९ हजार ९९० डिजिटल व्यवहारांतून तब्बल २३ कोटी २१ लाख ६२ हजार ३०० रुपयांची उलाढाल झाली आहे.

सहा आगारांमध्ये डिजिटल पेमेंटची सुविधा -
भंडारा विभागांतर्गत भंडारा, साकोली, तुमसर, पवनी, तिरोडा आणि गोंदिया या सहा आगारांमध्ये यूपीआय पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विभागात एकूण ८३६ अँड्रॉइड तिकीट मशीन असून, सर्व बसमध्ये डिजिटल पद्धतीने भाडे भरण्याची सोय करण्यात आली आहे. प्रवाशांना वाहकाच्या तिकीट मशीनवरील क्यूआर कोड मोबाइलद्वारे स्कॅन करून तिकिटाचे पैसे भरता येतात. त्यामुळे रोख रक्कम देण्याची आवश्यकता राहत नाही.

तिकीट विक्रीतील १५ ते २० टक्के व्यवहार डिजिटल -
उपलब्ध माहितीनुसार, एसटीच्या एकूण तिकीट विक्रीपैकी अंदाजे १५ ते २० टक्के व्यवहार यूपीआयच्या माध्यमातून होत आहेत. ही सुविधा सुरू झाल्यापासूनची एकत्रित आकडेवारी असून, ती एका वर्षातील व्यवहारांची नोंद नाही. नियमित प्रवास करणारे कर्मचारी, विद्यार्थी तसेच इतर प्रवाशांकडून या सुविधेचा वापर केला जात आहे.

पूर्वी प्रवासादरम्यान सुट्टे पैसे नसल्यास प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेकदा सुट्ट्या पैशांसाठी वाहक आणि प्रवाशांमध्ये धावपळ होत असे. मात्र, आता मोबाइलद्वारे थेट भाडे भरता येत असल्याने तिकीट काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. रोख रक्कम जवळ बाळगण्याची गरज कमी होण्याबरोबरच डिजिटल व्यवहारांमुळे आर्थिक नोंदींचा मागोवाही ठेवणे तुलनेने सोपे झाले आहे.

डिजिटल प्रवासाची ठळक आकडेवारी -
६ आगारांमध्ये यूपीआय पेमेंटची सुविधा
८३६ अँड्रॉइड तिकीट मशीन
१८,८९,९९० डिजिटल व्यवहार
२३,२१,६२,३०० रुपयांची एकूण उलाढाल
१५ ते २० टक्के तिकीट व्यवहार यूपीआयद्वारे होत असल्याचा अंदाज

तांत्रिक देखभालीचे आव्हान -
डिजिटल तिकीट व्यवहार सुरळीत राहावेत यासाठी अँड्रॉइड तिकीट मशीनची नियमित देखभाल केली जाते. मशीनची बॅटरी, प्रिंटर आणि नेटवर्क कनेक्टिव्हिटीची तपासणी करण्यात येते. मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास दुरुस्ती व तपासणीसाठी संबंधित कंपनीकडे पाठविण्यात येते.

काही वेळा प्रवाशांच्या बँक खात्यातून पैसे वजा होऊनही तिकीट व्यवहार पूर्ण होत नाहीत. अशा प्रकरणांमध्ये संबंधित बँक किंवा पेमेंट प्रणालीच्या नियमानुसार परताव्याची प्रक्रिया केली जाते. ग्रामीण भागातही यूपीआयद्वारे पैसे भरताना विशेष अडचणी येत नसल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले.

डिजिटल सुविधेला प्रवाशांचा प्रतिसाद -
क्यूआर कोड स्कॅन करून भाडे भरण्याची सुविधा नियमित प्रवाशांसाठी उपयुक्त ठरत आहे. विशेषतः विद्यार्थी, नोकरदार आणि दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना या सुविधेचा फायदा होत आहे. डिजिटल पर्यायामुळे एसटीच्या प्रवासातील आर्थिक व्यवहार अधिक सोयीस्कर झाले असून, रोख पैशांवरील अवलंबित्वही कमी होत आहे. क्यूआर कोड स्कॅन करून भाडे भरण्याची सुविधा नियमित प्रवाशांसाठी उपयुक्त ठरत आहे. डिजिटल पर्यायामुळे एसटीच्या प्रवासातील आर्थिक व्यवहार अधिक सोयीचे झाले आहेत.





  Print






Related Photos