खरगी या आदिवासी गावाने काढली दारूची प्रेतयात्रा !


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / धानोरा :  “सायेब मावा संस्कृतीते दांडगो मनवेके बताल कबाड आयो”, “दांडगो नावा संकृतीते मंता” , “आदिनसाठी मावा नाटे दांडगो बंद आयो पर्रो”  म्हणजे सायेब दारु माझ्या संस्कृतीचा भाग आहे. दारुशिवाय माझ्या संस्कृतीत कोणतंच काम होत नाही. त्यामुळे माझ्या गावातील दारु बंद होऊ शकत नाही, अशी अनेक वाक्ये गडचिरोलीतल्या अनेक आदिवासी गावागावातून ऐकायला मिळतात. पण धानोरा तालुक्यातल्या खरगी नावाच्या पूर्ण आदिवासी राहत असलेल्या गावाने चक्क दारुचीच प्रेतयात्रा काढली.
 मुक्तिपथच्या पुढाकाराने गावात ग्रामसभा घेण्यात आली त्यानंतर गावाने दारुबंदीचा निर्णय घेतला. ग्रामसभेतच दारु ही आमच्या समाजातील तरुणाईला लागलेली किड आहे.  त्यामुळे आमच्या गावातून दारुला कायमचं हद्द्पार करायचंच, असा निर्धार लोकांनी केला. त्यानुसार गावातील लोकांनी पुढाकार घेत दारुचीच अंत्ययात्रा काढण्याचे ठरवले. २०  तारखेला सकाळी आठ वाजता गावातील सर्व लोक जमा झाले. कुणी बांबू आणले. लोकांनी बांबूची  तिरडी बांधली, गावातील दारुविक्रेत्यांनी दारु बनवण्याचे साहीत्य, मटके, बाटल्या आणल्या. त्या तिरडीवर बांधल्या. या तिरडीला गावचे पोलीस पाटील रामभाऊ नरोटे तसेच लोमेश नरोटे, काशीराम नरोटे, दयाराम टेकाम यांनी खांदा दिला. समोर ढोल वाजवत “दारुवरती हल्ला बोल “, “दारु बंद मंता” म्हणत ही दारुची प्रेतयात्रा खरगीच्या चौकाचौकातून निघाली. यात महिलांच्या बरोबरीने गावातील पुरुषही सहभागी झाले होते हे विशेष. तिरडीवर रचलेली दारू आणि तिला कायमची मुठमाती द्यायला निघालेले आदिवासी बांधव हे दृष्य दारुबंदीच्या चळवळीतला आदिवासी जनतेचा उत्स्फूर्त  सहभाग दर्शवते. 
यावेळी मुक्तिपथ धानोरा संघटक सागर गोतपागर यांनी दारुविरोधात उभ्या राहीलेल्या या आदीवासी गावाचे अभिनंदन करुन  दारु आणि विकास या दोन्ही गोष्टी सोबत होऊ शकत नाहीत. गावाचा विकास करायचा असेल, तर आधी दारुबंदी झाली पाहीजे, असे सांगितले. मुक्तिपथ धानोरा तालुकाचे प्रेरक भास्कर कड्यामी , अक्षय पेद्दीवार , रवी आलोने यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.

प्रेतयात्रेत तिरडीला खांदा दिलेले कार्यकर्ते लोमेश नरोटे म्हणाले, 'आदिवासी संस्कृतीत मोहाच्या दारुपेक्षा मोहाच्या झाडाला महत्व आहे. मोहाच्या झाडाची साल काढुन जरी पाण्यात बुडवली आणि ते पाणि शिंपडले तरी आमच देवकाम होतं. मात्र सध्याच्या दारुच्या वापराने आमच्या गावागावातल्या तरुण पिढ्या बरबाद होत आहेत. ते कुठेतरी थांबलं पाहीजे यासाठी आम्ही गावातून ही प्रेतयात्रा काढली. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-23


Related Photos