महत्वाच्या बातम्या

 गांधी जयंतीनिमित्त बल्लाळशाह बाबा समाधी मंदिर परिसरात स्वच्छता श्रमदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नगर परिषद बल्लारपूरच्या वतीने स्वच्छता ही सेवा २०२६ आणि सेवा संकल्प अभियान अंतर्गत २ ऑक्टोबर रोजी ऐतिहासिक बल्लाळशाह बाबा समाधी मंदिर परिसरात विशेष स्वच्छता श्रमदान कार्यक्रम घेण्यात आला. सकाळी ७ वाजता आयोजित या उपक्रमात नगर परिषदेचे अधिकारी-कर्मचारी, स्वच्छता दूत तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या श्रमदानादरम्यान मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. परिसरातील कचरा, प्लास्टिक तसेच इतर अस्वच्छता दूर करून परिसर स्वच्छ व सुंदर करण्यात आला. गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छतेच्या माध्यमातून महात्मा गांधी यांनी दिलेल्या स्वच्छतेच्या संदेशाची जनजागृती करण्यात आली.

बल्लाळशाह बाबा समाधी मंदिर हे बल्लारपूरच्या ऐतिहासिक वारशाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासोबतच परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याचे आणि शहराचे सौंदर्य जपण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

या उपक्रमात उपमुख्याधिकारी रविंद्र भंडारवार, स्वच्छता विभागाचे अभियंता प्रशांत गणवीर, कार्यालय अधीक्षक सूरज वाघमारे, शहर समन्वयक मयुरी भोयर यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी-कर्मचारी, स्वच्छता दूत आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले. स्वच्छ बल्लारपूर, सुंदर बल्लारपूर, हरित बल्लारपूर या संकल्पनेतून गांधी जयंतीनिमित्त आयोजित या स्वच्छता श्रमदानातून स्वच्छता आणि ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाचा संदेश देण्यात आला.





  Print






Related Photos