सावलीत वाघाचा पुन्हा हल्ला : चार दिवसांत दुसऱ्या गुराख्याचा बळी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : सावली तालुक्यातील सामदा-नागोबा परिसरात वाघाच्या हल्ल्यात ४७ वर्षीय गुराख्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. अवघ्या चार दिवसांत वाघाच्या हल्ल्यात दुसऱ्या गुराख्याचा बळी गेल्याने सामदा परिसरासह जंगलालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगलातील कक्ष क्रमांक १५०१ मध्ये घडलेल्या या घटनेने मानव-वन्यजीव संघर्षाचे गांभीर्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
हेमंत अशोक भुरसे (४७) असे मृत गुराख्याचे नाव आहे. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते जनावरे चारण्यासाठी जंगलालगतच्या परिसरात गेले होते. दरम्यान, दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. बराच वेळ उलटूनही भुरसे घरी परतले नाहीत. त्यामुळे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी त्यांचा जंगल परिसरात शोध सुरू केला.
सुमारे चार ते पाच तासांच्या शोधानंतर जंगलात भुरसे यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वनअधिकाऱ्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
सामदा परिसरात चार दिवसांपूर्वीच वाघाच्या हल्ल्यात एका गुराख्याचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एका गुराख्याचा बळी गेल्याने परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगलालगत जनावरे चारण्यासाठी जाणाऱ्या गुराख्यांमध्ये दहशत पसरली असून, शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
दरम्यान, वाघाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांनी वनविभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. धोकादायक भागात वनविभागाने तातडीने गस्त वाढवावी, वाघाचा शोध घेऊन त्याचा बंदोबस्त करावा तसेच जंगलालगतच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सलग घडलेल्या या घटनांमुळे सावली तालुक्यात मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.




Petrol Price




