महत्वाच्या बातम्या

 १९ गुन्ह्यांच्या कुख्यात आरोपीवर एमपीडीएचा दणका : अमोल ईलमकर एक वर्षासाठी स्थानबद्ध


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : गणेशोत्सव व आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी सराईत आणि धोकादायक गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत चंद्रपूर जिल्हा पोलीस अभिलेखावरील कुख्यात गुन्हेगार अमोल आदेश ईलमकर २६ वर्षे रा. समतानगर, वॉर्ड क्र. ६, दुर्गापूर याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम (एमपीडीए) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ईलमकर याच्याविरुद्ध दुर्गापूर, रामनगर, बल्लारपूर, घुग्घुस आणि मुल पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न, शिवीगाळ, दुखापत तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत तब्बल १९ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचा पोलिसांचा दावा आहे.

गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. मात्र, त्यानंतरही गुन्हेगारी कारवाया सुरूच राहिल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी वसुमना पंत यांच्याकडे सादर करण्यात आला.

प्रस्तावाची दखल घेत जिल्हादंडाधिकारी वसुमना पंत यांनी १७ सप्टेंबर २०२६ रोजी अमोल ईलमकर यास एमपीडीए कायद्यांतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी केले. आगामी सण-उत्सवांच्या काळात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर पोलिसांची करडी नजर राहणार असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, दुर्गापूरचे ठाणेदार संतोष शेगावकर, मुलचे ठाणेदार विजय राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खरसान तसेच संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.





  Print






Related Photos