चंद्रपूरात भररस्त्यावर पेव्हर ब्लॉकने युवकाची हत्या : अर्ध्या तासात आरोपी पोलिसांच्या ताब्यात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील अतिवर्दळीच्या मुख्य मार्गावर सिमेंटच्या पेव्हर ब्लॉकने डोक्यावर वार करून एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवार २७ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील छोटा बाजार चौक सिग्नलजवळ असलेल्या श्रीमान सावजी भोजनालयासमोर ही घटना घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या अर्ध्या तासात आरोपीला ताब्यात घेतले.
या घटनेत रंजीत सुरेश राजवंशी ३६ वर्ष , रा. बल्लारपूर याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन दीपक कुरवे २९ वर्ष , रा. पंचशील चौक, जटपुरा वॉर्ड, चंद्रपूर याने रस्त्याच्या कडेला पडलेल्या सिमेंटच्या पेव्हर ब्लॉकने रंजीत याच्या डोक्यावर सलग सहा ते सात वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रंजीतचा मृत्यू झाला. शहरातील गजबजलेल्या रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेच्या वेळी परिसरात नागरिकांची वर्दळ होती. भररस्त्यावर युवकावर जीवघेणा हल्ला होत असताना नागरिक उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हल्ला थांबविण्यासाठी किंवा जखमी युवकाला मदत करण्यासाठी कोणी पुढाकार घेतला का, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, मृत रंजीत राजवंशी हा घटनेच्या दिवशी दुपारी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आला होता. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर तो कोणालाही न सांगता रुग्णालयातून निघून गेला होता. रात्री त्याची हत्या झाल्यानंतर रुग्णालयातील कागदपत्रांच्या आधारे त्याची ओळख पटविण्यात पोलिसांना मदत झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चंद्रपूर शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यातून संशयिताची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत हत्येच्या घटनेनंतर अवघ्या अर्ध्या तासात अमन कुरवे याला ताब्यात घेतले.
आरोपी अमन कुरवे याची यापूर्वीही चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, रंजीत राजवंशी याच्या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृत आणि आरोपी यांच्यात पूर्वीपासून काही वाद होता का, कोणत्या कारणातून हा हल्ला करण्यात आला आणि या घटनेमागे अन्य काही पार्श्वभूमी आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.
जिल्हा शासकीय रुग्णालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणासमोरील मुख्य मार्गावर घडलेल्या या हत्येने शहरवासीयांना हादरवून सोडले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीला अल्पावधीत ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असले, तरी हत्येमागील कारणांचा उलगडा होणे बाकी आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे करीत आहेत.




Petrol Price




