महत्वाच्या बातम्या

 कबड्डीत बीआयटीच्या मुलींचा विजयाचा डंका : मुलांचा संघ उपविजेता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या नागपूर विभागीय आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मुलींच्या संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले, तर मुलांच्या संघाने उपविजेतेपद मिळविले. एकाच स्पर्धेत मुलींच्या संघाने विजेतेपद आणि मुलांच्या संघाने उपविजेतेपद मिळविल्याने महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात मानाचा तुरा रोवला गेला.

बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे २३ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत मुलांचे १८ आणि मुलींचे ९ असे एकूण २७ महाविद्यालयीन संघ सहभागी झाले होते. विविध जिल्ह्यांतील संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदवत खेळाडूंनी आपले कौशल्य आणि क्रीडाप्रतिभेचे प्रदर्शन केले. मुलांच्या गटात राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय (आरसीईआरटी) संघाने विजेतेपद पटकावले, तर मुलींच्या गटात करंजीकर महाविद्यालय, साकोलीचा संघ उपविजेता ठरला.

स्पर्धेचे उद्घाटन बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष संजय वासाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ. राजनिकांत मिश्रा, पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत गोजे आणि क्रीडा विभागप्रमुख प्रकाश सातपैसे उपस्थित होते.

स्पर्धेच्या यशस्वितेसाठी प्रा. राहुल भोयर, अमोल चवरे आणि गितेश कौरासे यांनी विशेष परिश्रम घेतले. मुलींच्या संघाने मिळविलेले विजेतेपद आणि मुलांच्या संघाने मिळविलेले उपविजेतेपद यामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. या यशाबद्दल खेळाडूंचे कौतुक होत आहे.





  Print






Related Photos