कपडे धुताना पाय घसरला : नाल्यात बुडून महिलेचा मृत्यू


- खडकी गावातील घटना; सकाळी महिलांना पाण्यात आढळला मृतदेह
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : करडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडकी गावात नालाबंडिंगजवळ कपडे धुण्यासाठी गेलेल्या ५९ वर्षीय महिलेचा पाण्याच्या खोल खड्ड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी, २४ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. अनुरता भोलाराम आगाशे (वय ५९, रा. खडकी) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनुरता आगाशे या नेहमीप्रमाणे पहाटे घरातील पूजा-पाठ आटोपल्यानंतर गावाजवळील नालाबंडिंगवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि त्या नालाबंडिंगच्या खोल खड्ड्यात पडल्या.
नालाबंडिंगच्या खड्ड्यात पाण्याची खोली अधिक असल्याचा अंदाज न आल्याने तसेच पोहता येत नसल्यामुळे त्या पाण्यात बुडाल्या. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.
इतर महिलांना पाण्यात दिसला मृतदेह -
दरम्यान, गुरुवारी सकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास गावातील अन्य दोन महिला कपडे धुण्यासाठी नालाबंडिंगजवळ गेल्या. त्यावेळी त्यांना पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसला. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करून नागरिकांना माहिती दिली.
महिलांच्या आवाजाने परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर घटनेची माहिती पोलिस पाटील राजू बोंद्रे यांनी करडी पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांकडून पंचनामा -
घटनेची माहिती मिळताच करडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार गौरक्षनाथ नागलोत यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, तुमसर येथे पाठविण्यात आला.
या प्रकरणी करडी पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असून, घटनेचा पुढील तपास बिट अंमलदार मुलचंद मेश्राम आणि पोलिस शिपाई समीर मेश्राम करीत आहेत.
या घटनेमुळे खडकी गावात हळहळ व्यक्त होत असून, नालाबंडिंग परिसरातील पाण्याच्या खोल खड्ड्यांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.




Petrol Price




