पाणी टंचाई निवारण उपाययोजना : पाच नगरपंचायतींचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

- टंचाई निवारणासाठी आठ महिन्यांचे नियोजन; बंद बोअरवेलसह विहिरींच्या दुरुस्तीवर भर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : अल निनोच्या संभाव्य परिणामांमुळे निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद नगरपरिषद, नगरपंचायतींना स्वतंत्र आढावा घेत आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांनी पाच नगरपंचायतींचा आढावा घेतला. पुढील आठ महिन्यांसाठी पाणीपुरवठ्याचे नियोजन करून तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी नगरपंचायतींना दिले. जिल्ह्यातील नगर परिषद व पंचायत क्षेत्रांमध्ये पाणीटंचाई उद्भवू नये, यासाठी पर्यायी पाणी स्रोत उपलब्ध करणे, बंद बोअरवेल सुरू करणे, विहिरींची दुरुस्ती, पाइपलाईन गळती रोखणे आणि नवीन पाणीपुरवठा योजनांची कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हा नियोजन भवन येथे पाणीटंचाई निवारणासाठी आयोजित बैठकीत येरखेडा, भिवापूर, मौदा, महादूला आणि रामटेक नगर परिषद व पंचायतींच्या पाणीटंचाई निवारण उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करून आवश्यक कामांचे प्राधान्यक्रम निश्चित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पाइपलाइन गळती रोखून पाणीपुरवठा सुरळीत करा -
येरखेडा, महादुला आणि मौदा या क्षेत्रांतील पाणीपुरवठ्यांशी संबंधित समस्यांवर उपाययोजना करण्याच्या सूचना देऊन पाइपलाइनमधील गळती तातडीने दुरुस्त करणे, बंद पडलेल्या पाणीपुरवठा यंत्रणेची दुरुस्ती करणे आणि आवश्यकतेनुसार पर्यायी स्रोतांचा वापर करण्यावर भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या.
एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा नियमित करण्यासाठी नगर परिषद कामठीच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच १७ बोअरवेल आणि चार विहिरींच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर करणे, आवश्यकतेनुसार खासगी विहिरी अधिग्रहित करणे आणि नदीवर तात्पुरता बंधारा बांधण्यासाठी कार्यवाही करण्यास त्यांनी सांगितले.
सौरऊर्जेवरील लघु पाणीपुरवठा योजनांना प्राधान्य -
पाणीटंचाईग्रस्त प्रभागांमध्ये सौरऊर्जेवर आधारित लघु पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जलशुद्धीकरण केंद्रांच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर करणे, पाणी वितरण व्यवस्था नसलेल्या भागांत तातडीने वितरण व्यवस्था उभारणे आणि विहिरींच्या दुरुस्तीची कामे प्रस्तावित करण्यावर भर देण्यात आला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे प्रलंबित असलेल्या कामांमधील त्रुटींची पूर्तता करून ही कामे मार्गी लावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
त्या कंत्राटदारांवर आपत्ती व्यवस्थापनांतर्गत नोटीस -
नवीन पाणीपुरवठा योजनांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर भर देऊन नगरपंचायतींनी नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, याची खात्री करावी. कामात विलंब करणाऱ्या कंत्राटदारांना आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत काम पूर्ण करण्याबाबत नोटीस देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले. पाणीपुरवठा योजनांच्या वार्षिक देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी तातडीने कार्यादेश जारी करण्यास त्यांनी सांगितले.
रामटेकमध्ये ३२ विहिरींच्या दुरुस्तीचे नियोजन -
रामटेक नगर परिषदेकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या ३२ विहिरींच्या दुरुस्तीची कामे आवश्यकतेनुसार नियोजनबद्ध पद्धतीने हाती घ्यावे. जिल्हा वार्षिक योजना आणि जिल्हा खनिज क्षेत्र विकास निधीतून प्रस्तावित करावयाची कामे प्राधान्यक्रमानुसार तीन टप्प्यांत सादर करण्याचे निर्देश दिले संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करून आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करावे. प्रभाग क्रमांक २ आणि १० मधील नवीन पाणी वितरण व्यवस्थेच्या दरांना मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने कार्यादेश देऊन ३० नोव्हेंबरपर्यंत कामे पूर्ण होतील, याची दक्षता घ्यावी, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
टिल्लू पंपांवर जप्तीची कारवाई -
रामटेक नगर परिषद क्षेत्रातील बंद असलेले २० बोअरवेल तातडीने सुरू करण्याची कार्यवाही करावी. पाणीपुरवठा व्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या टिल्लू पंपांवर जप्तीची कार्यवाही करावी. भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन आवश्यकता भासल्यास दोन नवीन पाण्याच्या टाक्यांची कामे प्रस्तावित करावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
आतापर्यंत १६ नगरपरिषद, पंचायतीचा आढावा -
पाणी टंचाई सदृष्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत २९ नगर परिषद व पंचायतीपैकी १६ नगर परिषद व पंचायतराज आढावा घेतला. १३ पंचायत, परिषदेचा आढावा येत्या २८ व २९ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे.




Petrol Price




