महत्वाच्या बातम्या

 सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित अवयवदान शिबिरास जिल्हाभर प्रतिसाद


- जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अवयवदान

- मृत्यूनंतरही गरजूंच्या आयुष्यात आनंद पेरण्याचा संकल्प


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : सेवा संकल्प अभियानांतर्गत आज जिल्हाभर एकाचवेळी अवयवदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा व तालुकास्तरावर आयोजित या शिबिरात शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शिबिरात जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी ऑनलाईन नोंदणी करून अवयवदानाचे संमतीपत्र भरले. जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी सोमण यांच्या उपस्थितीत शिबिर घेण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्याहस्ते अवयवदान शिबिराचा जिल्हास्तरीय शुभारंभ झाला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजू रणवीर, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर खडतकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजसिंह पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील बेले, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नलिनी विखे, सामान्य रुग्णालयातील बाह्य संपर्क अधिकारी डॉ.विद्या पवार, नेत्र समुपदेशक प्रफुल्ल काकडे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी स्वत: ऑनलाईन संमतीपत्र भरून अवयवदानाचा संकल्प केला. यावेळी अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी देखील स्वयंस्फूर्तीने पुढे येत ऑनलाईन तर काहींनी ऑफलाईन नोंदणी केली. ऑफलाईन नोंदणी केलेल्यांचे अर्ज ऑनलाईन भरल्या जाणार आहे. जिल्हा मुख्यालयासह उपविभाग व तालुका स्तरावर देखील शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय, सर्व उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच विविध शासकीय कार्यालयांनी स्वयंस्फूर्तीने शिबिरांचे आयोजन करून अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून अवयवदानाचे संमतीपत्र भरून घेतले व मृत्यूनंतरही अवयवांची गरज असलेल्या नागरिकांच्या जीवनात आनंद पेरण्याचा संकल्प केला.

जिल्हा परिषदेत सीईओंच्या उपस्थितीत शिबिर -
जिल्हा परिषदेच्या सिंधु सपकाळ सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्या उपस्थितीत अवयवदान शिबिर व जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले तसेच जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. प्रत्येकाने अवयवदानाबाबत सकारात्मक भूमिका घेणे आवश्यक आहे. मृत्यूनंतर अवयवदानाच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते, असे पराग सोमण म्हणाले.





  Print






Related Photos