महत्वाच्या बातम्या

 जंगली हत्तींचा कळप धानाेरा वनविभागातील टिपागड पहाडी परिसरात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / धानाेरा : ओडिसा राज्यातून गडचिराेली जिल्ह्यात पाेहाेचलेल्या जंगली हत्तींचा कळप महाराष्ट्र- छत्तीसगड राज्याच्या सीमा क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून फिरत आहे. पंधरा दिवसांपूर्वी हत्तीचा हा कळप गाेंदिया जिल्ह्यात पाेहाेचला हाेता. तिथून पुन्हा गडचिराेली जिल्ह्याच्या कारेची तालुक्यात पाेहाेचला. रविवारी सायंकाळच्या सुमारास हत्तींचा हा कळप धानाेरा तालुक्यातील  टिपागड पहाडी परिसरातील गांगसाय, हुऱ्यालदंड या परिसरात पाेहाेचला आहे.
दरम्यान, सदर जंगली हत्ती रात्रीच्या सुमारास गांगसायटाेला, तलवारगड व येरमागड परिसरात येऊ शकतात, अशी शक्यता वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. जंगली हत्तींचा कळप जेव्हा गडचिराेली जिल्ह्यात छत्तीसगड राज्याच्या जंगल भागातून आला हाेता, आता हाच कळप काेरची तालुक्यातील जंगल परिसरात पाेहाेचला आहे. गेल्या तीन- चार दिवसांपासून हत्तींचा हा कळप पुढे- पुढे जात आहे. गतवर्षीसारखा हा हत्तींचा कळप आता ओडिसा राज्यात परत जाईल, असा अंदाज या भागातील नागरिक करीत आहेत. दरम्यान, फिरत असलेले हे जंगली हत्ती रस्त्यालगतच्या धान पिकाच्या शेतीत धुडघूस घालत असल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामाेरे जावे लागत आहे. सध्या धान पीक शेवटच्या टप्प्यात असून, पंधरा ते वीस दिवसांनंतर जड प्रतिच्या धानाची कापणी हाेणार आहे. मात्र, हत्तींमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हत्तींचा कळप धानाेरा वन विभागातील टिपागड पहाडी परिसरात पाेहाेचला आहे. मालेवाडा वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मात्र काेरची तालुक्यातील जंगलात हत्ती फिरत आहेत. या हत्तींवर वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची नजर आहे. पथक पूर्ण लक्ष ठेवून आहे.
गेल्या वर्षीसुद्धा हत्तींच्या कळपाने शेतातील पिकांचे माेठे नुकसान केले. यापाेटी पंचनामे व सर्वेक्षण झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने तब्बल २३ लाखांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली हाेती. यंदाही हत्तींनी पिकांचे नुकसान केली आहे. मात्र, अजूनही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही.
प्रतापगडमध्ये घर व धान पुंजण्याचे नुकसान झाले. यापूर्वी बुधवारला जंगली हत्तींच्या या कळपाने काेटगूल क्षेत्रातील येडजार गावातील एका शेतकऱ्याचे धानाच्या पुंजण्याचे नुकसान केले, तसेच गांगीण गावातील पाच घरांचे नुकसान केले हाेते. दरम्यान, त्यावेळी ग्रामस्थांनी हत्तींना पळवून लावण्यासाठी फटाके फाेडल्यानंतर हत्ती तेथून निघून गेले. काही दिवसांपूर्वी बेडगाव घाटाजवळ दुचाकीने काेरचीकडे येत असलेल्या एक व्यापारी व त्यांचा मुलावर हत्तींनी हल्ला केला. यात अपघात झाल्याने ते दाेघे जण किरकाेळ जखमी झाले हाेते. दरम्यान, तेव्हापासून बेडगाव परिसरातील नागरिक जागरूक झाले हाेते.






  Print






News - Gadchiroli




Related Photos