महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूर तालुक्यात महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी कृषी विभागाचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत महाराष्ट्र महिला शेतकरी सबलीकरण अधिनियम २०२६ अंतर्गत महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. बल्लारपूर तालुक्यातील जास्तीत जास्त महिला शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आकाश पवार यांनी केले आहे.

महिला शेतकऱ्यांना विविध शासकीय योजना, अनुदाने आणि कृषीविषयक सेवांचा सहज लाभ मिळावा, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. महिला शेतकरी पोर्टलच्या माध्यमातून प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार असून, कृषी सल्ला, प्रशिक्षण व मार्गदर्शन, विमा, कर्ज तसेच इतर कृषीविषयक सुविधांचाही लाभ घेता येणार आहे. महिला बचत गट आणि शेतकरी संघटनांसाठीही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी असून, महिला शेतकऱ्यांनी महिला शेतकरी पोर्टलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Apply Now हा पर्याय निवडावा. त्यानंतर आधार क्रमांकानुसार नाव व जिल्हा निवडून मोबाईलवर प्राप्त झालेल्या OTP द्वारे आधार पडताळणी करावी. पुढील टप्प्यात पत्ता, जात प्रवर्ग तसेच शेतीकामाचा प्रकार, जसे की पीक लागवड किंवा पशुपालन, याची माहिती भरावी.

कुटुंबातील सदस्याचा Farmer ID उपलब्ध असल्यास तो लिंक करून त्याची पडताळणी करावी. सर्व माहिती अचूक भरल्यानंतर Submit Application या पर्यायावर क्लिक करून अर्ज सादर करता येणार आहे.

अर्ज करताना किंवा योजनेचा लाभ घेताना कोणतीही अडचण निर्माण झाल्यास सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे कृषी विभागातर्फे कळविण्यात आले आहे. बल्लारपूर तालुक्यातील पात्र महिला शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






Related Photos