महत्वाच्या बातम्या

 मूलमध्ये डीजेचा दणदणाट भोवला : दहा जणांवर गुन्हे, ९४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : शारदा व दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीत निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजवून ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी मूल पोलिसांनी दहा जणांविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत. या कारवाईत डीजेसाठी वापरण्यात येणारी सहा वाहने, बेस व टॉप स्पीकर्स, मिक्सर, जनरेटर आणि अन्य साहित्य असा एकूण ९४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई २४ ऑक्टोबर रोजी विसर्जन मिरवणुकीदरम्यान करण्यात आली.

शारदा व दुर्गा देवी विसर्जन बंदोबस्ताच्या अनुषंगाने चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिलेल्या निर्देशानुसार मूल पोलीस ठाण्याचे पथक शहरात गस्त घालत होते. यावेळी ध्वनीक्षेपकांच्या आवाजाची तपासणी केली जात होती. दरम्यान, महात्मा फुले चौक ते गांधी चौक परिसरात विसर्जन मिरवणुकीत सहभागी असलेल्या डीजेचा आवाज कर्णकर्कश आणि निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांविरुद्ध कारवाई केली.

या प्रकरणी माँ परमेश्वरी दुर्गा मंडळाचे अध्यक्ष प्रवीण मूलीधर खानोरकर (वय ४५), रा. गुजरी चौक, मूल, डीजे चालक व मालक पंकज गणपत नैताम (वय ३५), रा. गडचिरोली, उमेश महादेवजी हुंडे (वय ३५), रा. चांदणी चौक, गोंदिया, रोहित विजय जुमडे (वय ३०), रा. बाबूपेठ, चंद्रपूर, नाग गणेश शारदा महिला मंडळाच्या अध्यक्ष वैशाली सचिन मोगरे (वय ३५), रा. नाग मंदिर चौक, वॉर्ड क्रमांक १६, मूल, डीजे चालक व मालक यश विश्वास बोलीवार (वय ३०), रा. आदर्शखेडा, ता. मूल, जि. चंद्रपूर, सरस्वती शारदा महिला मंडळाच्या अध्यक्ष फुल्ला विष्णू वालकोंडे (वय ६३), रा. ताडाळा रोड, मूल, डीजे चालक व मालक सुजित शरद रेड्डीवार (वय ३६), रा. वॉर्ड क्रमांक ८ मुल, सार्वजनिक महिला मंडळाच्या अध्यक्ष नंदनी गणेश रामशेट्टीवार (वय ३५), रा. वॉर्ड क्रमांक ९ मुल आणि डीजे चालक व मालक मनीष अशोक खोब्रागडे (वय ३५), रा. वॉर्ड क्रमांक ९ मुल यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

या कारवाईदरम्यान डीजे साउंड सिस्टिमसाठी वापरण्यात येणारी सहा वाहने, बेस व टॉप स्पीकर्स, मिक्सर, जनरेटर आणि अन्य डीजे साहित्य असा एकूण ९४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि मूलचे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय आर. राठोड यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, अमितकुमार आत्राम, रमेश हत्तीगोटे, पोलीस उपनिरीक्षक उत्तम कुमरे, सफौ. नगेश चलाख, पोलीस हवालदार नरेश कोडापे, नरेंद्र वाकडे, पंकज बगडे, पोलीस अंमलदार दिलीप आदे, प्रकाश चिकराम, शंकर बोरसरे, प्रदीप आत्राम, महिला पोलीस अंमलदार पूजा मेश्राम यांनी केले.

सार्वजनिक उत्सव व मिरवणुकांच्या काळात ध्वनीप्रदूषण रोखणे, सार्वजनिक शांतता राखणे आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही केली जात आहे. नागरिकांनी ध्वनीक्षेपक व डीजेचा वापर करताना निर्धारित ध्वनीमर्यादांचे पालन करावे आणि प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन मूल पोलिसांनी केले आहे.





  Print






Related Photos