सिंदेवाहीत प्रतिबंधित प्रेशरमिडचा वापर : गणेश मंडळावर गुन्हा, १५.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशरमिडचा वापर केल्याप्रकरणी सिंदेवाही पोलिसांनी नवयुवक बाल गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह डीजे मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई गुरुवार, २४ सप्टेंबर रोजी मौजा पवनपार, ता. सिंदेवाही येथे करण्यात आली. पोलिसांनी डीजेसह वाहन व इतर साहित्य असा एकूण १५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान प्रतिबंधित प्रेशरमिडचा वापर करून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर सिंदेवाही पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित डीजे मालक आणि गणेश मंडळाच्या कार्यकारिणीविरुद्ध पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे अपराध क्रमांक ५७०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३, ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम ३८(१), १३६ व ७० अन्वये गुन्हा दाखल केला.
या कारवाईत डीजे साउंड सिस्टिम, संबंधित वाहने आणि इतर साहित्य असा १५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक, चंद्रपूर, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलीस ठाण्याचे ठाणेदार कांचन पांडे यांचा नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार तसेच पोलीस अंमलदार संजय जुगनाके, नारायण येगेवार, शुभम उराडे, कमलेश फेंडर, सुनील बहेकार आणि नंदकिशोर तुमराम यांनी केले.




Petrol Price




