दिव्यांगाच्या जगण्याचा आधार असलेली मोपेड चोरली : रामनगर पोलिसांनी चोरट्याला केले जेरबंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : दिव्यांग व्यक्तीसाठी केवळ वाहन नव्हे, तर दैनंदिन जीवनातील अनेक अडचणींवर मात करण्याचे साधन असलेली मोपेडच चोरट्याने लंपास केली. दिव्यांग असल्याने विशेष बदल करून तयार केलेली होंडा अॅक्टिव्हा चोरीला गेल्याने बाळू पवार यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली. मात्र, रामनगर पोलिसांनी या प्रकरणाचा सातत्याने तपास करत चोरीची मोपेड शोधून काढली आणि संशयिताला ताब्यात घेतले. किशोर बाजीराव महाडोरे (वय ४२, रा. मेंडकी, ता. ब्रह्मपुरी) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीची मोपेड जप्त केली.
बालाजी वॉर्ड क्रमांक २, चंद्रपूर येथील बाळू तुकाराम पवार (वय ४९) हे दिव्यांग आहेत. त्यांच्या सोयीसाठी होंडा अॅक्टिव्हा मोपेडच्या मागील चाकाजवळ दोन अतिरिक्त चाके बसवून ती विशेष पद्धतीने तयार करण्यात आली होती. दैनंदिन जीवनातील कामे करण्यासाठी अशा वाहनाचा मोठा आधार असतो. मात्र, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान त्यांनी आपली मोपेड नगीनाबाग येथील सवारी बंगला चौकातील एका दुकानासमोर उभी केली असताना अज्ञात व्यक्तीने ती चोरून नेली. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली.
या घटनेनंतर बाळू पवार यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा क्रमांक १२०५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या वापरासाठी विशेष बदल केलेले वाहन चोरीला गेल्याने पोलिसांनीही या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू ठेवला.
तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, ही मोपेड किशोर बाजीराव महाडोरे याने चोरली आहे. त्याचा शोध घेत असताना तो वारंवार पोलिसांना चकवा देत होता. मात्र, रामनगर पोलिसांनी हार न मानता त्याचा सातत्याने माग काढला. अखेर त्याचा ठावठिकाणा शोधून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चोरीची मोपेड जप्त करण्यात आली. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणात चोरीला गेलेली मोपेड ही दिव्यांग व्यक्तीच्या दैनंदिन गरजांशी जोडलेली असल्याने तिची चोरी हा केवळ वाहनचोरीचा प्रकार नसून, संबंधित व्यक्तीच्या अडचणी वाढवणारा प्रकार ठरला. रामनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे चोरीची मोपेड पुन्हा शोधून काढण्यात यश आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर काकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सहायक पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे यांच्यासह पोलीस अंमलदार आनंद खरात, प्रकाश बलकी, मंगेश शेंडे, रामप्रसाद नैताम, बाबा नैताम, रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, पंकज ठोंबरे, प्रकाश मडावी, संदीप गेडाम, सुरेश कोरवार, पंकज पोंदे, सूरज शेडमाके, ब्ल्युटी साखरे यांनी केले.




Petrol Price




