महत्वाच्या बातम्या

 अमली पदार्थांच्या तपासणीच्या नावाखाली वृद्धाची फसवणूक : ३५ हजारांचा सोन्याचा गोफ पळविला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : मुलाला भेटण्यासाठी निघालेल्या ६३ वर्षीय वृद्धाला अमली पदार्थांच्या तपासणीचे कारण सांगून दोन अनोळखी व्यक्तींनी गंडा घातला. तपासणीच्या नावाखाली विश्वास संपादन करून वृद्धाच्या गळ्यातील सुमारे ३५ हजार रुपये किमतीचा सोन्याचा गोफ काढून घेत त्याऐवजी कागदाच्या पुडीत दोन बनावट साखळ्या ठेवून भामटे पसार झाले. ही घटना २३ ऑक्टोबर रोजी तळोधी बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

मेंढा वळणी येथील अशोक माधव रामटेके (वय ६३) हे आपल्या मुलाला भेटण्यासाठी दुचाकीने सावरगाव येथे जात होते. दरम्यान, नर्सरीजवळ दुचाकीवरून आलेल्या सुमारे ४० ते ५० वयोगटातील दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना थांबविले. अमली पदार्थांची तपासणी सुरू असून, सोन्याचे दागिने घालण्यास मनाई असल्याचे त्यांनी रामटेके यांना सांगितले.

त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून रामटेके यांनी गळ्यातील सुमारे १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफ काढून दिला. त्यानंतर या व्यक्तींनी गोफ कागदाच्या पुडीत बांधून तो दुचाकीच्या डिक्कीत ठेवण्याचे नाटक केले. मात्र, या दोघांनी चलाखीने सोन्याचा गोफ लंपास केला आणि त्याऐवजी पांढऱ्या रंगाच्या दोन बनावट साखळ्या पुडीत ठेवल्या.

सावरगाव बसस्थानकाजवळ पोहोचल्यानंतर रामटेके यांनी पुडी उघडून पाहिली असता, त्यात सोन्याच्या गोफाऐवजी बनावट साखळ्या आढळून आल्या. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांना धक्का बसला. कष्टाने मिळविलेला सोन्याचा गोफ अशा प्रकारे गमावल्याने त्यांचे सुमारे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले.

या घटनेनंतर रामटेके यांनी तळोधी बाळापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. या प्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींनी फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.

नागरिकांनी अनोळखी व्यक्तींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सोन्याचे दागिने काढून देऊ नयेत. तपासणीच्या नावाखाली कोणी अडवून दागिने मागत असल्यास सावध राहावे. अशा संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.





  Print






Related Photos