५ हजारांची लाच घेताना भंडारा येथील समाजकल्याण विभागातील कनिष्ठ लिपिक अडकला एसीबीच्या जाळयात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा :
सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय भंडारा येथील समाजकल्याण विभागातील कनिष्ठ लिपिक अभय मोतीराम पशिने (५३) यास ५ हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना शुक्रवार, १३ डिसेंबर २०१९ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या घटनेमुळे लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सविस्तर असे की, यातील तक्रारदार हे हरदोली ता. मोहाडी, जि. भंडारा येथील रहिवासी असून खाजगी कंपनीत सिक्युरिटी गार्डचे काम करतो. तक्रारदार अंदाजे ४० वर्षापासून हार्मोनियम वादक, भजनकार, गायक, नाटक कलाकार म्हणून स्थानिक पातळीवर मनोरंजनाचे काम करीत असून लोक कलाकार असून सध्या वयोवृद्ध आहे. सन २०१७-१८ मध्ये तक्रारदारास माहिती मिळाली की, शासनाकडून वृद्ध कालाकारांना मानधन योजने अंतर्गत मानधन मिळते. या माहितीवरून तक्रारदाराने सन २०१७-१८ मध्ये पंचायत समिती मोहाडी येथे सर्व संबंधित कागदपत्रासह या योजनेचा लाभ मिळण्याकरिता अर्ज केला होता. यावरून फेब्रुवारी २०१९ मध्ये तक्रारदाराला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांचे १ मार्च २०१९ रोजी कलेच्या तपासणी कार्यक्रमाकरिता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह सामाजिक न्याय भवन भंडारा येथे हजर राहण्याचे पत्र मिळाले. त्यानुसार १ मार्च रोजी तक्रारदाराने समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद भंडारा येथील अधिकाऱ्यांच्या कमिटीसमोर मुलाखत देवून कला सादर केली. मुलाखत संपल्यानंतर त्याच ठिकाणी जिल्हा परिषद भंडारा येथील समाज कल्याण विभागात कार्यरत असलेले कनिष्ठ लिपिक अभय पशिने यास भेटले असता तक्रारदारास जर या योजनेंतर्गत निवड करायची असेल तर मी मुलाखत घेणारया कमिटीकडून तुमचे गुण वाढवून तुमची निवड करून देतो असे म्हणून त्या कामासाठी ५ हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र तक्रारादारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा येथे तक्रार दाखल केली. यावरून लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांनी गोपनियरित्या शहानिशा करुन सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय भंडारा येथील कनिष्ठ लिपिक याच्याविरुद्ध सापळा रचला. दरम्यान तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना १३ डिसेंबर २०१९ रोजी अटक करण्यात आली. त्यावरून कनिष्ठ लिपिक अभय मोतीराम तशिने याच्याविरुद्ध पोलिस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई लाचलुचपत विभाग नागपूरचया पोलिस अधीक्षक श्रीमती रशमी नांदेडकर व अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक महेश चाटे, पोलिस निरीक्षक पुरुषोत्म अहेरकर, पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी, सहायक फौजदार गणेश पडवार, सचिन हलमारे, पराग राउत, अश्विनकुमार गोस्वामी, संजय कुरंजेकर, सुशील हुकरे, कोमल बनकर, रोशनी पटले, दिनेश धार्मिक यांनी केली आहे.  Print


News - Bhandara | Posted : 2019-12-13


Related Photos