५० हजारांची लाच घेताना वनपाल विकास मेश्राम अडकला एसीबीच्या जाळयात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / कोंढाळा (देसाईगंज) :
आरमोरी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या पळसगाव उपक्षेत्रातील वनपाल विकास उद्धवराव मेश्राम (५७) यास ५० हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ४ डिसेंबर २०१९ रोजी रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार हे आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथील रहिवासी असून शेतीचे काम करतात. तक्रारदाराने प्लाॅन्टेशनमध्ये झाडे लावण्यास खोदलेल्या खडयाजवळ केलेल्या मातीच्या कामाचे बिल १ लाख ४० हजार रुपये मिळण्याकरिता पळसगाव उपक्षेत्र, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय आरमोरी येथे बिल सादर केले असता तेथील कार्यरत वनपाल विकास उद्धवराव मेश्राम यास भेटले असता त्यांनी तक्रारदारास ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार याची वनपाल विकास मेश्राम यास लाच रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथील अधिकाऱ्यांना भेटून तक्रार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोलीचे पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची गोपनीयरित्या शहानिशा करून वनपाल विकास मेश्राम याच्याविरुद्ध योजनाबद्धरित्या सापळा कार्यवाहीचे आयोजन केले. त्यामध्ये वनपाल विकास मेश्राम याने आपल्या लोकसेवक पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता तक्रारदारास प्लाॅन्टेशनमध्ये झाडे लावण्यास खोदलेल्या खडयाजवळ केलेल्या मातीच्या कामाचे बिल १ लाख ४० हजार रुपये देण्याकरिता ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन ४ डिसेंबर रोजी भगतसिंग चौकाजवळ लाच रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमुने रंगेहात पकडले. वनपाल मेश्राम याच्याविरुद्ध पोलिस स्टेशन आरमोरी येथे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. वनपाल विकास मेश्राम याच्या निवासस्थानाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चमूद्वारे झडती सुरू आहे. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुददलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र गरड, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, पोलिस हवालदार प्रमोद ढोरे, नाईक पोलिस शिपाई सतीश कत्तीवार, पोलिस शिपाई महेश कुकूडकार, चालक पोलिस शिपाई तुळशीराम नवघरे, घनश्याम वडेट्टीवार यांनी केली आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-05


Related Photos