फोर्टिसचे माजी प्रवर्तक मलविंदर सिंह यांना मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ईडी कडून अटक


विदर्भ न्यूज  एक्सप्रेस 
वृत्तसंस्था  / मुंबई :
फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक मलविंदर सिंह यांना मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. मलविंदर सिंह यांच्यासोबत रेलिगेयर एंटरप्रायजेसचे माजी सीएमडी सुनील गोधवानी यांनाही अटक करण्यात आली आहे. ईडीने रेलिगेयर फिनवेस्ट लिमिटेडमध्ये (आरएफएल) केलेल्या पैशांच्या अफरातफरी प्रकरणी ही कारवाई केली आहे.
आरोप आहे की, मलविंदर सिंह आणि सुनील गोधवानी यांनी आरएफएलच्या फंडमध्ये घोटाळा केला असून यामुळे २९३७ कोटींचं नुकसान झालं. ईडीने तिहार जेलमधून दोघांचाही ताबा घेतला आहे. सध्या एका घोटाळ्याप्रकरणी दोघेही तिहार जेलमध्ये असून तिथेच ईडीने त्यांना अटक केली असल्याची माहिती प्रकरणाशी संबंधित वकिलाने दिली आहे. सिंह आणि गोधवानी दोघांनाही कारागृहात महानदर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात येणार आहे. यावेळी ईडी चौकशीसाठी त्यांच्या कोठडीची मागणी करणार आहे.
ऑक्टोबर महिन्यात दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मलविंदर यांना त्यांचा भाऊ शिविंदर, गोधवानी, कवी अरोरा आणि अनिल सक्सेना यांना अटक केली होती. डिसेंबर २०१८ मध्ये रेलिगेयर फिनवेस्ट लिमिटेडने दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती. त्यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. चौकशी झाल्यानंतर त्या दोघांनाही पोलिसांनी जेरबंद केलं.  Print


News - Rajy | Posted : 2019-11-14


Related Photos