महत्वाच्या बातम्या

 मतदान केंद्रावरील निवडणूक पथकांची तिसरी सरमिसळ प्रक्रिया पूर्ण


- सामान्य निवडणूक निरीक्षक व जिल्हाधिका-यांची उपस्थिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी केंद्रावर जाणा-या निवडणूक पथकांची तिसरी सरमिसळ (रॅन्डोमायझेशन) प्रक्रिया बुधवारी (दि. १७) निवडणूक आयोगाने दिलेल्या संगणक प्रणाली द्वारे पार पाडण्यात आली. यावेळी सामान्य निवडणूक निरीक्षक लोकेशकुमार जाटव व जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. उपस्थित होते. या प्रक्रियेनुसार, कोणत्या मतदान केंद्रावर कोणते पथक जाईल, हे मतदानाच्या एक दिवसापूर्वी म्हणजे १८ एप्रिल २०२४ रोजी संबंधित पथकांना कळविण्यात येणार आहे.

१३ - चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शुक्रवार १९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळत होणार आहे. यापूर्वी सरमिसळ प्रकियेने प्रत्येक मतदारसंघनिहाय मनुष्यबळाचा पुरवठा करण्यात आला असून मतदान पथकांचे दोन प्रशिक्षणसुध्दा घेण्यात आले आहे. बुधवारी पार पडलेल्या तिस-या सरमिसळ प्रक्रियेने कोणत्या मतदान पथकाला कोणते मतदान केंद्र मिळणार आहे, ते निश्चित झाले आहे. सामान्य निवडणूक निरीक्षक यांच्या स्वाक्षरीने सदर माहिती सीलबंद लिफाफामध्ये टाकून प्रत्येक विधानसभा मतदार संघातील सहायक निवडणूक अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. यानंतर सहायक निवडणूक अधिकारी हे प्रत्येक पथकांना मिळालेल्या मतदान केंद्राबाबत माहिती देऊन मतदानाचे संपूर्ण साहित्य घेऊन रवाना करणार आहेत. 

जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडलेल्या या प्रक्रियेकरीता निवासी उपजिल्हाधिकारी तथा मनुष्यबळ व्यवस्थापन कक्षाचे नोडल अधिकारी संजय पवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, राष्ट्रीय सुचना केंद्राचे प्रमुख गणेश खडसे, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले आदी उपस्थित होते.

असे आहे विधानसभा मतदारसंघनिहाय मनुष्यबळ : राजुरा विधानसभा मतदारसंघात ३३० मतदार केंद्र असून एकूण मनुष्यबळ १४७२ आहे तर ३८ पथक राखीव आहेत.  चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात ३८३ मतदार केंद्र, एकूण मनुष्यबळ १७०० तर ४२ पथक राखीव, बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात ३६१ मतदार केंद्र, एकूण मनुष्यबळ १६०० तर ३९ पथक राखीव, वरोरा विधानसभा मतदारसंघात ३४० मतदार केंद्र, एकूण मनुष्यबळ १५१२ तर ३८ पथक राखीव, वणी विधानसभा मतदारसंघात ३३८ मतदार केंद्र, एकूण मनुष्यबळ १५०४ तर ३८ पथक राखीव तर आर्णि विधानसभा मतदारसंघात ३६६ मतदार केंद्र असून १६२४ मनुष्यबळ आणि ४० पथक राखीव आहेत. अशाप्रकारे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरीता एकूण २११८ मतदान केंद्रासाठी ९४१२ मनुष्यबळ उपलब्ध असून २३५ पथके राखीव आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos