वर्ष समाप्ती व नववर्षाच्या पार्श्वभुमीवर दारु पिवून वाहन चालविणाऱ्यावर होणार दंडात्मक कार्यवाही
- ड्रंक अँड ड्राईव्हच्या विशेष मोहीमेद्वारे होणार कडक अमंलबजावणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात 31 डिसेंबर 2022 रोजी वर्ष समाप्ती व नववर्षाचे स्वागत मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. सदर उत्सव साजरा करण्याकरीता अतिउत्साही तरुणमंडळी मद्य प्राशन करून दुचाकी, चारचाकी वाहने भरधाव वेगाने, बेदरकारपणे चालवितात. त्यासोबतच रोडने रश ड्रायविंग, स्टंटबाजी सारखे कृत्य करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडून जीवितहानी होत असते. सदर प्रकारावर आळा घालण्याच्या दृष्टीने 30 डिसेंबर 2022 ते 1 जानेवारी 2023 पर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात येणार आहे.
कोणीही व्यक्ती मद्य प्राशन करून वाहन चालविणार नाही. जर मद्य प्राशन करून वाहन चालवितांना आढळून आल्यास सदर व्यक्तीवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. जिल्ह्यातील वाढते अपघात कमी करण्याकरीता वाहतूक नियंत्रण शाखा,चंद्रपूर व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात ड्रंक अँड ड्राईव्हच्या विशेष मोहीमेद्वारे कडक अमंलबजावणी करण्यात येणार आहे.
नववर्षाचे स्वागत करतांना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व अपघात होणार नाही याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे चंद्रपूर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी कळविले आहे.
News - Chandrapur