महत्वाच्या बातम्या

 वर्धा लोकसभा मतदारसंघात ३१ चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : ०८ वर्धा लोकसभा मतदार संघासाठी २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार आहे. आदर्श आचार संहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एस.एस.टी, एफ.एस.टी, व्ही.एस.टी., व्ही.व्ही.टी यांच्यासह विविध पथकांचे गठण करण्यात आले आहे. निर्भय व मुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी वर्धा लोकसभा मतदार संघात एकूण ३१ चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.

यापुर्वीच वर्धा लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदार संघात विविध चेकपोस्टला मुख्य निवडणूक निरीक्षक, खर्च निरीक्षकांनी, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन वाहन तपासणीबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी वाहन तपासणीसाठी पथकांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

निवडणूक काळात मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी अवैध दारुसाठा व रोख रकमेला आळा घालण्यासाठी वाहनांची कसून तपासणी केली जात असून स्थायी निगराणी पथकामार्फत घटनाक्रमाचा पुरावा गोळा करण्यासाठी रोख व मद्य पकडणे या घटनेची व्हिडिओ रेकॉर्डींग करण्यात येत आहे.

नुकतीच ४ एप्रिल २०२४ रोजी स्थायी निगराणी पथकाकडून आदित्य पॅलेस जवळ, येळाकेळी येथे चेकपोस्टवर वाहन तपासणी सुरू असतांना ७ लक्ष रुपयांची रक्कम आढळली. या रक्कमेबाबत योग्य ते पुरावे नसल्याने व रक्कम संशयास्पद असल्यामुळे ताब्यात घेवून जिल्हा कोषागार, वर्धा येथे सिलबंद पेटीत जमा करण्यात आली आहे. तसेच लोकसभा मतदार संघातील विविध ठिकाणी अवैध मद्यसाठा सुध्दा जप्त करण्यात आला आहे.

एसएसटी तसेच एफएसटी पथकाव्दारे पकडण्यात आलेल्या रोख रक्कमेला सोडण्याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली कॅश रिलीज समिती स्थापन करण्यात आली आहे. पकडण्यात आलेली रोख रक्कम वैध दस्ताऐवजांची तपासणी करुन लगेच सोडण्याबाबत ही समिती निर्णय घेणार असून अवैधपणे सापडलेली रोख रक्कम आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.





  Print






News - Wardha




Related Photos