आरोग्यास हानीकारक असलेल्या ३४३ औषधांवर औषध नियंत्रक विभागाने आणली बंदी


वृत्तसंस्था / नवीदिल्ली : एका औषधामध्ये एकापेक्षा अधिक घटक वापरून तयार करण्यात येणाऱ्या ३४३ औषधांवर अखेर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.  ही औषधे आरोग्यास हानीकारक असल्याने केंद्रीय आरोग्य विभागाच्या औषध नियंत्रक विभागाने   बंदी आणली आहे. हा निर्णय़ औषधनिर्माण क्षेत्रातील  त्यामुळे सॅरेडॉन , डी कोल्ड टोटल सारख्या तात्काळ गुणकारी ठरणाऱ्या गोळ्या मिळणार नाहीत. 
गेल्या काही वर्षांमध्ये प्रतिजैविकांचा प्रतिरोध सातत्याने वाढता आहे. वाढते प्रदूषण, व्याधींचे बदलते प्रकार आणि त्यामुळे निर्माण होणारा प्रतिरोध हा रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरतो आहे. प्रतिजैविकांचा वाढता वापर वेळीच आटोक्यात आणला नाही तर त्याचे दुष्परिणाम सर्वसामान्य रुग्णांना मोठ्या प्रमाणात सोसावे लागतील याकडेही वैद्यकीय तज्ज्ञ सातत्याने लक्ष वेधत होते. काही वेळा औषधांमध्ये एकापेक्षा अधिक घटकांची आवश्यकता नसते. तरीही आजारावर त्वरित उतारा मिळावा यासाठी ही औषधे दिली जातात. या फिक्स्ड डोस कॉम्बिनेशनच्या औषधांचे प्रमाण बाजारामध्ये सातत्याने वाढते आहे. त्यामुळे या औषधांचे सेवन हे रुग्णांच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरत असल्याच्या असंख्य तक्रारी केंद्र सरकारच्या औषधनियंत्रक विभागाकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत औषध नियंत्रक विभागाने ही कारवाई केली आहे. औषधनियंत्रक विभागाकडे आलेल्या या तक्रारींची दखल घेत दोन वर्षांपूर्वी अशा ३४३ फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन असलेल्या औषधांवर अखेर बंदी जाहीर केली, मात्र या निर्णयाविरोधात औषध कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. त्यानुसार दीड वर्षापूर्वी पहिल्या टप्प्यात घातलेली ही बंदी उठवण्यात आली. 
औषधांमधील हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी हितकारक नसल्याचे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश असलेली समितीही स्थापन करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या शिफारसींचाही विचार हा निर्णय घेताना करण्यात आला आहे. औषध कंपन्यांनी फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन योग्य असल्याबद्दल याचिका दाखल केली होती. त्यावेळी झालेल्या सुनावणीच्या वेळीही औषधनियंत्रक विभागाने ही औषधे हानीकारक असल्याचे यासंदर्भात केलेल्या अभ्यासातील निष्कर्षासह निदर्शनास आणून दिले. या बंदीमुळे औषध कंपन्यांमध्ये नाराजी पसरली असली तरीही औषधविक्रेत्यांनी मात्र या निर्णयाचे स्वागत केले आहे. अनेकदा गरज नसताना प्रतिजैविकांप्रमाणे ही औषधेही रुग्णांना दिली जातात. त्यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो. आता या औषधांना पर्यायी व तितकीच गुणकारी औषधे रुग्णांना उपलब्ध होतील, अशी अपेक्षा औषधनिर्माण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.   Print


News - World | Posted : 2018-09-13


Related Photos