निवृत्तीवेतनधारकांसाठी जिल्हा कोषागार कार्यालयात डिजिटल लाईफ सर्टिफिकेटची सुविधा

- २६, २७ व ३० नोव्हेंबर रोजी विशेष व्यवस्था; आधार कार्ड, पीपीओ क्रमांक व बँक पासबुक सोबत आणण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्तीवेतन अखंडितपणे सुरू राहावे, यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने डिजिटल लाईफ सर्टिफिकेट (डिजिटल जीवन प्रमाणपत्र) काढण्याची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुरुवार, २६ नोव्हेंबर, शुक्रवार, २७ नोव्हेंबर आणि सोमवार, ३० नोव्हेंबर २०२६ या तीन दिवशी जिल्हा कोषागार कार्यालय, गडचिरोली तसेच जिल्ह्यातील सर्व उपकोषागार कार्यालयांमध्ये कार्यालयीन वेळेत पूर्णवेळ ही सुविधा उपलब्ध राहणार आहे.
निवृत्तीवेतनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात आपला हयातीचा दाखला अर्थात जीवन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. हे प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यास निवृत्तीवेतन वितरण प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे निवृत्तीवेतनधारकांची, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच त्यांना एकाच ठिकाणी ही प्रक्रिया पूर्ण करता यावी, या उद्देशाने कोषागार कार्यालयाने तीन दिवसीय विशेष व्यवस्था केली आहे.
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांनी आधार कार्ड, आधार क्रमांकाशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक, पीपीओ (पेन्शन पेमेंट ऑर्डर) क्रमांक आणि बँक खाते पासबुक सोबत आणणे आवश्यक आहे. या कागदपत्रांच्या आधारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
ज्या निवृत्तीवेतनधारकांनी अद्याप आपले जीवन प्रमाणपत्र सादर केलेले नाही, त्यांनी या विशेष सुविधेचा लाभ घेऊन निर्धारित कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण करावी. यामुळे त्यांचे निवृत्तीवेतन विनाअडथळा सुरू राहण्यास मदत होईल. जिल्ह्यातील सर्व संबंधित निवृत्तीवेतनधारकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी धर्मराव पेंदाम यांनी केले आहे.




Petrol Price




