युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, एकूण संपत्ती ११ कोटी ३८ लाख


वृत्तसंस्था / मुंबई :  युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून  आज (गुरूवारी) त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या आई रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे हेदेखील उपस्थित होते. 
 या अर्जाबरोबर आदित्य यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये एकूण संपत्ती ११ कोटी ३८ लाख रुपये असल्याचे म्हटले आहे. यामध्ये बँक ठेवी १० कोटी ३६ लाख असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
‘नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी हीच ती वेळ’ असल्याचे म्हणत आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. ठाकरे कुटुंबीयांच्या पाच दशकांच्या राजकीय कारकीर्दीत निवडणूक लढविणारे आदित्य हे पहिलेच ठाकरे आहेत. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणुकीच्या राजकारणात पडण्याचे टाळले होते. निवडणूक लढविणार नाही, पण स्वपक्षीय सरकारवर आपलाच ‘रिमोट कंट्रोल’ चालेल, असे शिवसेनाप्रमुख नेहमी सांगत असत. शिवसेनाप्रमुखांचाच कित्ता उद्धव ठाकरे यांनी गिरवत कोणतीही निवडणूक लढविली नाही. मनसेचे प्रमुख राज ठाकरे हेसुद्धा अद्याप तरी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले नाहीत. वरळीमध्ये झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी आपण या मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केलं होतं. वरळीचे आमदार सुनील शिंदे यांच्याशी चर्चा करूनच आपण निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर करीत असल्याचेही आदित्य यांनी सांगितलं. 
  Print


News - Rajy | Posted : 2019-10-03


Related Photos