महत्वाच्या बातम्या

 नागपुरातील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र बर्ड फ्लू बाधीत क्षेत्र म्हणून घोषीत


- जिल्हा दंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश : नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन

विदर्भ न्युज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : नागपूर प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र येथे गत काही दिवसांपासून तुरळक मरतुकीचे प्रमाण पशुसंवर्धन विभागाच्या लक्षात आले. यावर अतिदक्षता घेऊन सुरुवातीला योग्य त्या खबरदारीसह निगराणी ठेवण्यात आली. दोन मार्च रोजी मरतुक जास्त प्रमाणात आढळल्यामुळे मृत पक्षी अन्वेषणासाठी पुणे येथे पाठविण्यात आले. जी मरतुक झाली त्याचे नमुने NIHSAD भोपाल येथे पाठविण्यात आले होते. तपासणीअंती नागपूर येथील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र येथील कोंबड्यांची मरतुक एव्हियन इन्फ्ल्युएन्झा (बर्ड फ्लू) मुळे झाल्याचे आढळून आले. 

सदर वस्तुस्थिती लक्षात घेऊन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी प्राण्यांमधील संक्रमण व रोगप्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ व बर्ड फ्लू नियंत्रण कृती आराखड्यानुसार प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रापासून एक किलोमीटर परिसर हा बाधीत क्षेत्र म्हणून घोषीत केला आहे. याचबरोबर दहा किलोमीटरपर्यंतचा परिसर हे निगराणी क्षेत्र म्हणून घोषीत केले आहे.

कुक्कुट शेड निर्जंतुकीकरण करण्यास सर्वोच्च प्राधान्य देऊन योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश पशुसंवर्धन विभागाला जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी दिले. कुक्कुट शेड निर्जंतुकीकरण करण्यास सर्वोच्च प्राधान्य देऊन बाधीत क्षेत्रातील कुक्कुट पक्षी खाद्य खरेदी, वाहतूक, बाजार, जत्रा, प्रदर्शन आयोजित करण्यास पुढील २१ दिवसांपर्यंत प्रतिबंधही लागू करण्यात आले आहेत. संसर्ग केंद्रापासून दहा किलोमीटर त्रिज्येतील निगराणी क्षेत्रात अबाधित क्षेत्रामधून कुक्कुट पक्षी, अंडी व कुक्कुट खाद्य यांच्या वाहतुकीस मज्जाव राहणार नाही, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ४ मार्च रोजीच्या आदेशात स्पष्ट केले आहे.    

जिल्हाधिकारी नागपूर यांच्या आदेशानुसार व केंद्र शासनाच्या अधिनियमानुसार जिल्हात शिघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली. ४ मार्च रोजी रात्री ९ वाजेपासून अंडी उबवणी केंद्र नागपूर येथील उर्वरित पक्षी नष्ट करण्याची कारवाई सुरु करण्यात आली. पाच मार्च रोजी अखेरपर्यंत येथील एकूण ८ हजार ५०१ पक्षी व १६ हजार ७७४ अंडी तसेच ५ हजार ४०० किलो पक्षी खाद्य शास्त्रोक्त पध्दतीने नष्ट करण्यात आले.

प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतीबंध व नियंत्रण अधिनियम २००९ व Action Plan for Prevention, Control and Containment of Avian Influenza (Revised २०२१) नुसार जिल्हाधिकारी यांनी प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र नागपूर या संसर्ग केंद्रापासून एक किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित केला. त्यानुसार एक किलोमीटर परीघातील नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय येथील कुक्कुट फार्म वरील २६० पक्षी, पक्षीखाद्य व इतर अनुषंगीक साहित्य सुध्दा दिनांक 5मार्च रोजी नष्ट करण्यात आले.

०६ मार्च रोजी प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र नागपूर संस्थेच्या संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण पूर्ण करण्यात आले. वरील रोग प्रादुर्भावाच्या अनुषंगाने जिल्हातील सर्व पशुवैद्यकीय अधिकारी यांना अवगत करण्यात आले असून जिल्हात कुठेही असामान्य मरतुक आढळून आलेली नाही. शेतकरी व पशुपालक यांनी घाबरुन न जाता जागरुक राहणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नागपूर यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos