प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पोलिसांची करडी नजर : आणखी एका आरोपीला अटक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांच्या विरोधात राज्यभरात पोलिसांकडून जोरदार मोहिम राबविण्यात येत आहे. प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या एका आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट पाचने अटक केली आहे.
छुप्या मार्गाने प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या या विक्रेत्याकडून १३ हजार ६०० रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. नंदकिशोर श्यामराव मौंदेकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो नागपुरातील टिमकी, दादरा पूल, येथील रहिवासी आहे. गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने शनिवार, ६ जानेवेरीच्या दुपारी ही कारवाई केली. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पोलिसांची करडी नजर -
मकर संक्रांत म्हटली की, पतंग उडवण्याची मोठी परंपरा आहे. मात्र पतंगसोबत लागणारा प्रतिबंधित नायलॉन मांजा हा पक्षी, प्राणी आणि नागरिकांसाठी जीवघेणा ठरतो आहे. मकर संक्रात सणाच्या पार्श्वभूमीवर पतंगोत्सवासाठी वापरण्यात येणारा नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी असून देखील त्याची छुप्या पद्धतीने सर्रास विक्री होतानाचे चित्र आहे. प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांच्या विरोधात राज्यभरात पोलिसांची जोरदार मोहिम राबविण्यात येत आहे. प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांचा शोध नागपूर पोलीस घेत आहेत. अशीच एक कारवाई करण्यात पोलिसांना यश आले आहे.
प्रतिबंधित मांजासह आरोपीला अटक -
गुन्हे शाखेच्या युनिट पाच दुपारी गस्त घालत होते. तेवढ्यात त्यांना एक व्यक्ती आपल्या घरी मांजा विकत असल्याची गुप्त माहिती मिळाली. दरम्यान, या पथकाने सापळा रचून आरोपी नंदकिशोरच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात प्रतिबंधित नायलॉन मांजा आढळून आला. ज्यामध्ये मोनोकाईट फायटर लेबल असलेल्या मांजाचे १७ बंडलचा समावेश असून त्यांची किंमत १३ हजार ६०० इतकी आहे. या कारवाईमध्ये आरोपीविरुद्ध कलम १८८, सहकलम ५, १५ पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पर्यावरणाच्या दृष्टीने घातक -
मकर संक्रांतीसाठी वापरण्यात येणाऱ्या घातक मांजामध्ये नायलॉन आणि काचेच्या कोटिंगचा वापर केला जातो. त्यामुळे या मांजाचे सहजा सहजी विघटन होत नाही. त्यामुळे मकर संक्रांत झाल्यानंतर देखील हा मांजा झाडांवर आणि इतरत्र तसाचे पडून राहतो. त्यामुळे अनेक पशू-पक्षी त्यामध्ये गुंतून त्यात त्यांचा मृत्यू होतो. सोबतच यात आजवर नायलॉन मांजामुळे अनेक नागरिक जखमी झाले आहेत, तर कित्येकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. नायलॉन मांजामुळे विजेच्या तारांचे घर्षण होऊन आग लागून वीज प्रवाह खंडित होण्याचे प्रकारही घडतात. घरातील इलेक्ट्रिक उपकरणांनाही बाधा पोहोचते. नायलॉन मांजाचा वापर हा पर्यावरणाच्या दृष्टीने देखील घातक आहे. नायलॉन मांजा लवकर तुटत नाही. तसेच त्याचा नाशही होत नाही.
News - Nagpur