महत्वाच्या बातम्या

 अवैध रेती तस्करीतील ४ हायवा ट्रक सह १ करोड ८३ लाख  २० हजाराचा मुद्देमाल जप्त


- स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील रेतीघाट बंद असतानाही रेती माफियांकडून नदी, नाले पोखरले जात असून मोठ्या प्रमाणावर अवैध तस्करी सुरू आहे. दरम्यान, तस्करांविरुद्ध पोलीस विभागाने कारवाईची मोहीम सुरू केली असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून चार हायवा ट्रक जप्त करीत अवैध उत्खनन करून तस्करी करण्यात येणारा रेती साठा जप्त केला आहे. या कारवाईत सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

संजय निवृत्ती देवकते (५०) रा. पल्लेश्वरी, ता. जिवती, अंबादास राजू आत्राम (३०) रा. अंबेझरी, ता. जिवती, सूरज प्रकाश कुमरे (२८) रा. लाठी, ता. गोंडपिपरी, सद्दाम वजीर शेख रा. शेणगाव, ता. जिवती, अशोक धर्मराज राठोड (२६) रा. पाटण, ता. जिवती, सचिन भोयर रा. गडचांदूर, ता. कोरपना अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. रेती घाटांचे लिलाव झालेले नाहीत. अशाही स्थितीत जिल्ह्यातील खासगी बांधकामासह शासकीय बांधकामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेतीचा पुरवठा केला जात आहे. अवाढव्य किमतीत रेती विकली जात आहे.

दिवसाढवळ्या रेती तस्करी केली जात असताना महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, पोलीस विभागाने आता तस्करांची नाकाबंदी सुरू केली आहे. दरम्यान चार ते पाच हायवा ट्रकमधून रेतीची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यामध्ये अवैध रेती तस्करीतील ४ हायवा ट्रक सह १ करोड ८३ लाख  २० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

या माहितीच्या आधारे नारंडा बसस्थानकासमोर सापळा रचला. संशयित हायवा ट्रक येताच वाहने अडवून चालकांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे आढळून आली नाही. त्यामुळे ही चारही ट्रक आणि रेती साठा जप्त करण्यात आला आहे. एम. एच. ३४/बीजी ९५२०, एम. एच. ३४/ बीझेड ०२२१, एम. एच. ३४/ बीझेड ५७७३ आणि एम. एच. ३४/ बीझेड ९३१० या क्रमांकाचे हायवा ट्रक जप्त करण्यात आले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास गायकवाड, पोहवा नीतेश महात्मे, जमीर पठाण, अनुप डांगे, मिलिंद चव्हाण, प्रसाद धुळगुंडे यांच्या पथकाने केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos