महत्वाच्या बातम्या

 मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांनी कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने विवाह सोहळ्यामध्ये अनाठाई खर्च करणे प्रकार टाळण्यासाठी विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी कन्यादान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ नवदाम्पत्यांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील नवदाम्पत्यांना सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहनपर २० हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. अनुदान वधुचे वडील, आई किंवा पालकाच्या नावे धनादेशाव्दारे प्रदान करण्यात येणार आहे. तसेच सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रति पात्र जोडपे ४ रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे.

यासाठी वधु व वर महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असावे, वधु व वर पैकी व्यक्ती  विमुक्त  जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्गातील असावा. वराचे वय २१ व वधुचे वय १८ पेक्षा कमी असू नये. अनुदान केवळ पहिल्या विवाहास अनुज्ञेय असेल विधवा महिलेस दुसऱ्या विवाहाकरीता  अनुदान अनुज्ञेय असेल. बाल विवाह कायदा व हुंडा प्रतिबंधक कायद्यांचा भंग दाम्पत्यांकडून होणार नाही या आशयाचे शपथपत्र सादर करणे आवश्यक आहे. दाम्पत्यांकडे जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या संस्था, यंत्रणा नोंदणीकृत असावी. विवाह सोहळ्यामध्ये किमान १० जोडप्यांचा अंतर्भाव असणे आवश्यक आहे. सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणे करीता संस्थेस क्षेत्रबंधन लागु होणार नाही. संस्थेने विवाह सोहळा संपन्न होण्याच्या किमान १५ दिवस अगोदर सोहळा आयोजनसंदर्भातील कागदपत्र परिशिष्ट अ प्रमाणे जोडप्यांची माहिती सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयास सादर करावी.

योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक नवदाम्पत्यांनी, स्वयंसेवी संस्थांनी सहाय्यक संचालक ईतर मागास कल्याण कार्यालय सामाजिक न्याय भवन येथे अर्ज सादर करावा, असे सहाय्य संचालक प्रसाद कुळकर्णी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos