महत्वाच्या बातम्या

 नागपूर जिल्ह्यात ३ मार्चला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम


- जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला नियोजनाचा आढावा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत ३ मार्चला जिल्ह्यातील पाच वर्षाखालील बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे. यासाठी पोलिओ बूथची व्यवस्था करण्यात आली असून त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे. ही मोहिम प्रभावीपणे राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आरोग्य विभागांना दिले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आज पोलिओ लसीकरण नियोजनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रेवती साबळे, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ.राज गहलोत,  जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. विद्यानंद गायकवाड, डॉ. मोहम्मद साजीद यांच्यासह जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.   

पोलिओच्या समूळ उच्चाटनाच्या अनुषंगाने ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालय क्षेत्र, महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात विशेष पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेचे नियोजन करण्यात आले आहे. ३ मार्चला सकाळी आठ ते सायंकाळी पाचदरम्यान ही लसीकरण मोहीम राबविली जाईल.

ज्या मुलांचे पोलिओ डोस काही कारणास्तव राहून जातील त्यांना ५ ते ९ मार्चदरम्यान आयपीपीआयअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन पोलिओ डोस दिला जाईल. या विशेष पोलिओ लसीकरण मोहिमेचा सर्व लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा व यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.        

जागतिक आरोग्य संघटनेने १९८८ मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले. त्यानुसार महाराष्ट्रात १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दर वर्षी राबविण्यात येत आहे. यामध्ये पाच वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओची लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात येते.

येथे मिळणार पोलिओ डोस : 
जिल्ह्यातील सर्व शासकीय दवाखान्यांमध्ये, आपल्या घराजवळील पोलिओ बुथवर, बसस्थानक, रेल्वेस्थानक, मोबाईल बुथ आदी भागांमध्ये पोलिओ लसीकरण बूथचे नियोजन करण्यात आले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos