मुरुमगाव येथील गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी प्राथमिक चौकशी


- उपलब्ध वैद्यकीय नोंदी व संबंधितांकडून प्राप्त माहितीच्या आधारे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून पडताळणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : मुरुमगाव परिसरातील दिव्या रामसिंग उसेंडी ३१ वर्ष या गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने उपलब्ध वैद्यकीय नोंदी तसेच संबंधित आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, कुटुंबीय व अन्य संबंधित व्यक्तींकडून प्राप्त माहितीच्या आधारे प्राथमिक चौकशी केली आहे. प्राथमिक चौकशीत निदर्शनास आलेल्या बाबींची सविस्तर पडताळणी करून आवश्यकतेनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी कळविले आहे.
प्राथमिक चौकशीनुसार, संबंधित महिला ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र, मुरुमगाव येथे दाखल झाली होती. तपासणीदरम्यान तिची प्रकृती गंभीर असल्याचे निदर्शनास आले. तसेच प्राथमिक माहितीनुसार, आरोग्य संस्थेत दाखल होण्यापूर्वीच गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्यानंतर आवश्यक प्राथमिक उपचार करून महिलेला पुढील उपचारासाठी उच्चस्तरीय आरोग्य संस्थेकडे संदर्भित करण्यात आले.
उपलब्ध नोंदींच्या प्राथमिक पडताळणीत संबंधित महिलेची गर्भधारणेदरम्यान नियमित नोंदणी, प्रसूतीपूर्व तपासणी (ANC) आणि सातत्यपूर्ण आरोग्य तपासणी अपेक्षित प्रमाणात झाल्याचे स्पष्ट पुरावे उपलब्ध नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच गर्भधारणेच्या कालावधीत नियमित फॉलोअप, घरभेटी, संभाव्य जोखीम ओळखणे आणि संस्थात्मक प्रसूतीचे नियोजन याबाबत अपेक्षित सातत्य होते किंवा नाही, याचीही पुढील पडताळणी करण्यात येत आहे.
जिल्हा आरोग्य प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, प्राथमिक चौकशीत निदर्शनास आलेल्या बाबींची सविस्तर पडताळणी करून आवश्यकतेनुसार संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. माता आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी गर्भवती मातांची वेळेवर नोंदणी, नियमित ANC तपासणी, उच्च जोखीम गर्भवतींचे प्रभावी ट्रॅकिंग, नियमित घरभेटी तसेच आवश्यकतेनुसार वेळेत उच्चस्तरीय आरोग्य संस्थेकडे संदर्भित करण्याच्या व्यवस्थेबाबत संबंधित आरोग्य यंत्रणेला आवश्यक निर्देश देण्यात येत आहेत.
सदर चौकशी प्राथमिक स्वरूपाची असून, महिलेच्या मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण तसेच या प्रकरणाशी संबंधित अन्य बाबींबाबत आवश्यक वैद्यकीय व प्रशासकीय कार्यवाही नियमानुसार करण्यात येत आहे. त्यामुळे या टप्प्यावर कोणताही अंतिम निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. नागरिकांनी या प्रकरणाबाबत अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी केले आहे.




Petrol Price




