गडचिरोली जिल्ह्यातील जांभुळखेडा आदर्श ग्राम स्पर्धेत राज्यात तिसरे


- महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत (व्हीएसटीएफ) सन्मान
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत (व्हीएसटीएफ) घेण्यात आलेल्या आदर्श ग्राम स्पर्धेचा निकाल मूल्यांकन समितीचे अध्यक्ष तथा आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी जाहीर केला. यात गडचिरोली जिल्ह्यातील जांभुळखेडा गावाला आदर्श ग्रामचा राज्यस्तरीय तृतीय  पुरस्कार जाहीर झाला आहे.
 नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील आदिवासी क्षेत्र असलेल्या चिखली या गावाला प्रथम पुरस्कार मिळाला आहे. राज्य सरकारच्या सर्व योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविणे, त्या माध्यमातून गावे समृध्द करणे हा ‘व्हीएसटीएफ’चा मूळ उद्देश आहे. जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय परिवर्तकांची नियुक्ती करुन गावपातळीवर अभियान राबविले जात आहे. गावाला मिळालेल्या सन्मानाबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांनी गावाचे अभिनंदन केले आहे.
व्हीएसटीएफ मार्फत राज्यातील १  हजार गावांमध्ये ग्राम परिवर्तन व समाज परिवर्तनाचे काम सुरू आहे. शासनाच्या योजना थेट जनतेपर्यंत पोहचविण्याचे, जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. या अंतर्गत जनतेच्या सहभागातून योजनांची अंमलबजावणी व गावांचा विकास होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मागील दोन वर्षात झालेल्या या कामांच्या आधारावर आदर्श ग्राम स्पर्धा राबविण्यात आली. त्यासाठी राज्यातील गडचिरोलीसह नंदुरबार, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, रायगड, पुणे या १२ जिल्ह्यातील २४ गावांची निवड करण्यात आली. आदर्श ग्राम स्पर्धेमध्ये द्वितीय पुरस्कार गणेशवाडी (ता.कळंब, जि.यवतमाळ) व शेंदोला खुर्द (ता.तिवसा, जि.अमरावती) या दोन गावांना विभागून देण्यात आला आहे. तर तृतीय पुरस्कार जांभूळखेडा (ता.कुरखेडा, जि.गडचिरोली), खारसाई (ता.म्हसाळा, जि.रायगड), घाटकूळ (पोंभुर्णा, जि.चंद्रपूर) या तीन गावांना विभागून देण्यात आला आहे. 
जांभुळखेडा गाव आदर्श करण्यात गावाचे ग्रामस्थ तसेच सरपंच शिवाजी राऊत, ग्रामसेवक लता डोंगरवार तर ग्रामपरिवर्तक श्याम वावरे यांनी कार्य केले. या कामामध्ये सर्व आजी माजी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी, ग्रामसेवक यांचे सहकार्य लाभल्याचे ग्रामपरिवर्तक यांनी सांगितले. शाळा समिती, बचत गट, महिला ग्राम संघ, गावातील तरूण मंडळ, पेसा समिती यांचे वेळोवेळी सहकार्य मिळाले. 
गावाविषयी माहिती - ग्रामपंचायत जांभुळखेडा गेली २ वर्षापासून महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून काम करत आहे. ग्रामपंचायत जांभुळखेडा हे गाव तालुक्यापासून चार किमी अंतरावर आहे. या पूर्ण ग्रामपंचायतीची लोकसंख्या १०६७ आहे. जांभुळखेडा गाव म्हणजे सुंदर, सुशिक्षित लोक जास्त असलेलं गाव. गावात २२७  घर असलेले असं गाव आहे. गावात जिल्हा परिषदेची वर्ग १ ते ७ पर्यंत शाळा आहे,  ग्रामपंचायत कार्यालय आहे. गावात कृषी सेवक, आरोग्यसेवक, तलाठी, ग्रामसेवक सतत उपलबद्ध असतात. पिण्याच्या पाण्याच्या साठी सार्वजनिक पाणीपुरवठा आहे. तसेच हातपंप, विहिरींचा उपयोग केला जातो. अंगणवाडी खूप चांगल्या पद्धतीने किशोरी, महिला, स्तनदा माता व  मुलांची काळजी घेते.  गेली २ वर्षात गावात एकही बालमृत्यू झाला नाही.  दरमहिन्याला आरोग्य व पोषण दिन साजरा केला जातो. महिला गट यात मोठ्या संख्येने व उत्साहाने सहभागी होतात.  सोलर आधारित अंगणवाडी आहे. १००% हागणदारी मुक्त गाव आहे.   ग्रामपचायतीने गावात तसेच शाळेत व अंगणवाडीत सुरक्षेच्या दृष्टीने CCTV कॅमेरा लावलेले आहेत.  तंटामुक्त गाव आहे. गावात ग्रामपंचायात मार्फत वाचणालय आहे. शाळेतील मुलांना डीजीटल साक्षर होता यावे म्हणून ग्राम सामाजिक अभियान अंतर्गत जि.प.शाळेला संगणक कक्ष तयार करून देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून वनराई बंधारे लोकसहभागातून बांधण्यात आले. संपूर्ण गावाच्या शिवारात वनराई बंधारे लोकसहभाग व श्रमदानातून बंधारे टाकण्यात आले व जिल्हयातून याबाबत प्रथम क्रमांकाचे बक्षिसही पटकावले. या आणि शासनाच्या अनेक योजनांची यशस्वी अंमलबजावणी या गावात लोकसहभागातून झाली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-20


Related Photos