अयोध्या प्रकरणी सुनावणी १८ ऑक्टोबरपर्यंत संपवा : सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
सर्वोच्च न्यायालयात गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या रामजन्मभूमी-बाबरी मशीदीचा खटला पुढच्या दोन महिन्यात निकाली निघाण्याची शक्यता आहे. सुनावणी १८ ऑक्टोबरपर्यंत संपण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीचा २६ वा दिवस होता. पक्षकारांना सुनावणीसाठी किती दिवस आवश्यक आहेत याची विचारणा सर्वोच्च न्यायलयाने २५ व्या दिवशी केली होती. पक्षकारांच्या वकिलांनी सुनावणीसाठी लागणारा कालावधी चर्चेने निश्चित करावा असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. 
मध्यस्थ समितीद्वारे तोडगा अपेक्षित असल्यास पक्षकारांना मसलतीचीही मुभा देण्यात आली आहे. वेळ कमी असल्यास दररोज एक तास अधिक किंवा शनिवारीही याप्रकरणी सुनावणी होऊ शकत असल्याचे सरन्यायाधीशांनी सांगितले.
१८ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण करण्यासाठी, सर्वांनी मिळून यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असेही गोगोई यांनी सांगितले. जर सुनावणी १८ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण झाली तर निर्णय लिहणे आणि सुनावण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुस्लिम पक्षकारांना बाजू मांडण्यासाठी हा आठवडा आणि पुढील संपूर्ण आठवडा लागेल असे राजीव धवन यांनी म्हटले आहे. तर हिंदू पक्षकारांना उलट युक्तीवादासाठी २ दिवस आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. १८ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा प्रयत्न असेल असे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटले आहे. १८ नोव्हेंबरला सरन्यायाधीश गोगोईंचा कार्यकाळ संपणार आहे. 
  Print


News - World | Posted : 2019-09-18


Related Photos