बॉक्सर मेरी कोम यांची पद्मविभूषण पुरस्कारासाठी शिफारस


- पद्म पुरस्कारांसाठी ९ महिला खेळाडूंची निवड
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : देशाच्या दुसऱ्या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी बॉक्सिंगमध्ये सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या बॉक्सर मेरी कोम यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. मेरी कोम यांना २०१३ मध्ये पद्मभूषण आणि २००६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे क्रीडा मंत्रालयाने ज्या नऊ अॅथलिट्सच्या नावांची शिफारस पद्म पुरस्कारांसाठी केली आहे, त्या सर्व महिला आहेत!
बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिच्या नावाची पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. तिचं नाव यापूर्वी २०१७ मध्येही देण्यात आलं होतं, पण तेव्हा तिला हा सन्मान मिळाला नाही. तत्पू्र्वी २०१५ मध्ये सिंधूला पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
पद्मविभूषण सन्मान आतापर्यंत तीन पुरुष खेळाडूंना मिळाला आहे. बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद (२००७), सचिन तेंडुलकर (२००८) आणि गिर्यारोहक सर एडमंड हिलरी (२००८, मरणोत्तर) हे खेळाडू पद्मविभूषण आहेत. मेरी कोम आणि सिंधूव्यतिरिक्त कुस्तीपटू विनेश फोगाट, टेबल टेनिसपटू मोनिका बत्रा, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, हॉकीपटू रानी रामपाल, माजी शूटर सुमा शिरूर आणि गिर्यारोहक जुळ्या बहिणी ताशी आणि नुंगशी मलिक यांची नावे पद्म पुरस्कारांसाठी क्रीडा मंत्रालयाने प्रस्तावित केली आहेत.
News - World | Posted : 2019-09-12