महत्वाच्या बातम्या

 डुक्कर पकडण्याच्या वादातून तरुणाला मारहाण : दुचाकीची चावी हिसकावली, जीवे मारण्याची धमकी


विदर्भ नव एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : डुक्कर पकडून घेऊन जाण्यास विरोध केल्याने एका तरुणाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना वरोरा शहरातील जिजामाता वॉर्ड परिसरातील सहारा पार्क येथे ११ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली. यावेळी तरुणाच्या दुचाकीची चावी जबरदस्तीने हिसकावून घेतल्याप्रकरणी अनिल नेताजी लोणारे आणि मिमा दांडेकर या दोघांविरुद्ध वरोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

राहुल राजन नकये (वय ३५), रा. जिजामाताबाई वॉर्ड, एकार्जुना रोड, वरोरा हे सफाई कामगार म्हणून काम करतात. आपल्या उदरनिर्वाहासाठी सफाईचे काम करण्यासोबतच ते डुक्कर पालनही करतात. डुकरांच्या शेडकडे येऊन डुक्कर चोरी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या कारणावरून त्यांचा अनिल लोणारे आणि भीमा दांडेकर यांच्याशी यापूर्वी वाद झाला होता.

११ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजताच्या दरम्यान राहुल यांना त्यांच्या मित्राचा फोन आला. दोन व्यक्ती त्यांचे डुक्कर पकडून घेऊन जात असल्याचे मित्राने सांगितले. ही माहिती मिळताच राहुल यांनी आपल्या दुचाकीने जिजामाता वॉर्डातील सहारा पार्क परिसर गाठला. तेथे अनिल लोणारे आणि मिमा दांडेकर हे डुक्कर घेऊन जात असल्याचे त्यांना दिसले. राहुल यांनी त्यांना डुक्कर पकडून का घेऊन जात आहात, असा जाब विचारला.

यावरून वाद निर्माण झाला. अनिल लोणारे याने राहुल यांची गचांडी पकडून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दोघेही डुक्कर दुचाकीवर ठेवून घेऊन जात असताना राहुल यांनी विरोध केला. त्यानंतर डुक्कर खाली ठेवून दोघांनी राहुल यांना पकडले. त्यापैकी एकाने त्यांना मारहाण केली, तर दोघांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याचवेळी राहुल यांच्या खिशातील दुचाकीची चावी जबरदस्तीने हिसकावून घेण्यात आली.

तुझ्याकडून जे होईल ते करून घे, आम्ही तुझी गाडी घेऊन जात आहोत, असे म्हणत आरोपींनी राहुल यांना धमकावले आणि घटनास्थळावरून निघून गेले. या घटनेनंतर राहुल यांनी आपल्या मोठ्या भावाला आणि त्याच्या दोन मित्रांना माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या मदतीने वरोरा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

राहुल यांच्या तक्रारीवरून वरोरा पोलिसांनी आरोपी अनिल नेताजी लोणारे आणि भीमा दांडेकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.





  Print






Related Photos