गडचिरोलीत पाचव्या आदिवासी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरू


- बाबुराव मडावी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजन; खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते उद्घाटन, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सखाराम डाखोरे संमेलनाध्यक्ष
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा निर्मितीचे शिल्पकार स्वर्गीय बाबुराव मडावी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गडचिरोली येथे नवोदित आदिवासी साहित्य परिषदेच्या पाचव्या आदिवासी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या आयोजनासाठी आयोजकांकडून जय्यत तयारी सुरू असून, साहित्यिक, कवी, लेखक आणि आदिवासी समाजातील साहित्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ज्येष्ठ कवयित्री कुसुम अलाम यांनी २४ नोव्हेंबर रोजी माध्यमांना ही माहिती दिली.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली आणि क्रांतिवीर नारायणसिंग उईके विकास समिती, ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. आदिवासी समाजाची समृद्ध साहित्यपरंपरा, संस्कृती, बोलीभाषा, लोककला आणि सामाजिक विचारविश्वाला व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच नवोदित आदिवासी साहित्यिकांना प्रोत्साहन देणे हा या संमेलनामागील प्रमुख उद्देश आहे.
संमेलनाच्या नियोजनानुसार, सकाळी १० ते ११ या वेळेत आयटीआय चौक ते संमेलनस्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. या ग्रंथदिंडीच्या माध्यमातून साहित्य, वाचनसंस्कृती आणि आदिवासी साहित्यिक परंपरेचा जागर करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून, आमदार डॉ. मिलिंद नरोटे सहउद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पालघर जिल्ह्यातील वसई येथील ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक प्रा. डॉ. सखाराम डाखोरे यांची संमेलनाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याशिवाय माजी मंत्री शिवाजीराव मोघे, आदिवासी परिषदेचे दिनेश मडावी आणि सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
आदिवासी समाजाच्या साहित्यिक योगदानाची ओळख व्यापक स्तरावर व्हावी, आदिवासींच्या मौखिक परंपरा, लोकसाहित्य, बोलीभाषा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन व्हावे, तसेच नव्या पिढीतील लेखक-कवींना आपले विचार मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, या दृष्टीने हे संमेलन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
जिल्ह्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत योगदान देणारे बाबुराव मडावी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून आयोजित करण्यात येणाऱ्या या साहित्य संमेलनामुळे गडचिरोलीच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्राला नवी ऊर्जा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांकडून विविध स्तरांवर तयारी सुरू आहे.




Petrol Price




