महत्वाच्या बातम्या

 चंपाई सोरेन यांनी घेतली झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / झारखंड : झारखंड मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्ष चंपाई सोरेन यांनी आज झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. राज्यपालांनी चंपाई सोरेन यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली. तत्पूर्वी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्ष चंपाई सोरेन यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. मात्र राज्यपालांकडून त्यांना शपथविधीसाठी आमंत्रित करण्यात आले नव्हते. त्यामुळे झारखंडमध्ये राजकीय पेच निर्माण झाला. अखेर गुरुवारी राज्यपालांनी त्यांना आमंत्रण दिले आणि शुक्रवारी दुपारी चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यासह काँग्रेसच्या कोट्यातून आलमगीर आलम आणि आरजेडीच्या कोट्यातून सत्यानंद भोक्ता यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

कोण आहेत चंपाई सोरेन?

शिबू सोरेन यांच्यासोबत चंपाई सोरेन यांनी झारखंड राज्याची मागणी रेटून धरली. झारखंड मुक्ती मोर्चाच्या फुटीनंतरही ते शिबू सोरेन यांच्यासोबत राहिले. १९९१ ला ते पहिल्यांदा अपक्ष आमदार झाले आणि त्यानंतर त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चात प्रवेश केला. २००० मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकार करावा लागला. मात्र २००५ पासून ते सातत्याने विजयी होत आहेत. राज्यात पहिल्यांदा भाजप आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार बनले तेव्हाही ते मंत्री होते. पुढे हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चा सरकारमध्ये चंपाई सोरेन यांना अन्न, नागरी पुरवठा आणि वाहतूक मंत्री करण्यात आले. हेमंत सोरेन २०१९ मध्ये पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर चंपाई यांना परिवहन, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय कल्याण मंत्री करण्यात आले आहे. चंपाई झारखंड मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्षही आहेत. हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर चंपाई यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आणि आज त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.





  Print






News - World




Related Photos