नागरिकांनी आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची नोंदणी करावी : नगराध्यक्षा योगिता पिपरे


- नगरपरिषद गडचिरोली येथे शिबिराचे आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
दारिद्र्य रेषेखालील पिवळ्या शिधापत्रिकाधारक, अंत्योदय व अन्नपूर्णा पात्रधारक तसेच दारिद्रयरेषेवरील ८३.७२ लाख कुटूंबांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहेत. तसेच कुटूंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न १ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या कुटूंबांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे गडचिरोली नगरपरिषदेअंतर्गत वास्तव्यास असणाऱ्या  नागरिकांनी आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी गडचिरोली नगरपरिषदेत नोंदणी करण्याचे आवाहन नगराध्यक्षा योगिता पिपरे यांनी केले.
दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान नगरपरिषद आणि जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक नगरपरिषद गडचिरोली येथे महिला बचत गटाकरिता आरोग्य आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्षा योगिता पिपरे बोलत होत्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा योगिता पिपरे यांच्याहस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून डाॅ.सुरेंद्र इरपनवार, वैद्यकीय समन्वयक डाॅ.प्रिती गोलदार, डी.एम.ओ.डाॅ.कृतिका कवठे, आरोग्य मित्र कांचन इरकुलवार, आरोग्य मित्र श्रीकांत कोसरे, जयकुमार भैसारे आदी उपस्थित होते.
शंभर दिवस स्वस्थ एसएचजी कार्यक्रमाच्यावतीने आरोग्य शिबिर, ई-कार्ड वाटप आणि पोषण आहार कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत महिला बचत गटांचे नोंदणीकरण नगरपरिषद गडचिरोली येथे सुरू आहे. या योजनेचे नोंदणीकरण ५ सप्टेंबपर्यंत नगरपरिषद येथे होणार आहे.
पुढे बोलतांना नगराध्यक्षा पिपरे म्हणाल्या, नागरिकांनी टाॅन्सिल, फुफ्फुसातले वाल, नाकातील तुटलेले हाड, जन्मापासून असलेले अपंग हात व पायाचे सहा बोट, हाडाचे ट्युमर आदी आजारांचा आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार करून घ्यावे. त्याकरिता नोंदणी करावी. तसेच कॅन्सर हदयरोग शस्त्रक्रिया, मुत्रपिंड व मुत्रमार्ग विकार, मेंदू व मज्जासंस्था विकार, अस्थिव्यंग आदी आजारांचे उपचार करण्याकरिता महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून केले जाणार आहे. त्यामुळे गडचिरोली नगरपरिषदेतील नागरिकांनी आपल्या अमूल्य जीवनाची काळजी घेत नोंदणी करून घ्यावी आणि सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावे. तसेच पात्र कुटूंबांनी ५ लाख वैद्यकीय सेवा असलेला विमा भरून घ्यावे. त्यामुळे स्वस्तात उपचार करणे सोपे होवून कुटूंबाचे जीवनमान उंचावता येणार आहे. आयुष्यमान भारत योजनेत ज्या कुटूंबांचे नाव नाही त्यांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनाचा लाभ देण्यात येत आहे. गरोदर आणि स्तनदा मातांनी नगरपरिषदेत आपली नोंदणी करून मातृवंदना योजनेतून ५ हजार रूपयांचा लाभ घ्यावे, असेही नगराध्यक्षा पिपरे म्हणाल्या.
मागील ७ दिवसांपासून आतापर्यंत ई-कार्डकरीता एकूण २७०० महिलांची नोंदणी झाली आहे. नोंदणी न केलेल्या कुटूंबांनी नगरपरिषदेत येवून नोंदणी करावी, असेही आयोजकांनी सांगितले आहे.
कार्यक्रमाचे संचालन गणेश ठाकरे तर आभार गणेश नाईक यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अल्केश बन्सोड, तुप्ती मल, प्रविण रामटेके, दिनेश धोटे, कृष्णा आत्राम, अश्विनी कोल्हे, कैलास बंकावार यांनी सहकार्य केले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-28


Related Photos