तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध : आरोपीसह नागपुरातून ताब्यात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन शोध-४ अंतर्गत चंद्रपूर जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) व मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाने (AHTU) उल्लेखनीय यश मिळवत तीन वर्षांपासून पळवून नेण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीचा तसेच आरोपीचा शोध लावला आहे.
चिमूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अप. क्र.१३५/२०२४ अंतर्गत कलम ३६३ व ३७० भादंवि अन्वये गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी संशयिताच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केले. तपासादरम्यान संबंधित मोबाईल क्रमांक दिल्ली येथे कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) व अन्य तांत्रिक माहितीचे सखोल विश्लेषण करण्यात आले.
या विश्लेषणातून पीडित अल्पवयीन मुलगी आणि संशयित आदित्य कैलास खोब्रागडे (वय २१), रा. लोहारा, ता. चिमूर हे दिल्लीहून नागपूर येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एलसीबी व एएचटीयू पथकाने तात्काळ कारवाई करत १० जून रोजी नागपूर येथील यशोधरा नगर परिसरातून दोघांना ताब्यात घेतले.
त्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही व तपासासाठी मुलगी आणि आरोपी यांना चिमूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा उलगडा होऊन पोलिसांना महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक काँक्रेटवार, बलराम झाडोकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकर, पोलीस हवालदार चेतन गज्जरलावार, सुमीत बर्डे, ऋषभ बारशिंगे, विजयमाला बोरकर, निराशा तीतरे तसेच सायबर सेलच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
या यशस्वी कारवाईबद्दल जिल्हा पोलिसांच्या विशेष पथकाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
News - Chandrapur




Petrol Price




