महत्वाच्या बातम्या

 आपली बसच्या ताफ्यात १४३ इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : राज्यात इलेक्ट्रिक वाहन धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे. त्यानुसार इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. याचेच एक पुढचे पाऊल म्हणून नागपूर महापालिकेच्या आपली बस सेवेत एप्रिल महिन्याच्या शेवटी २४, मे महिन्यात ६० आणि जून महिन्यात ५९ अशा १४३ इलेक्ट्रिक बसेस नागपुरच्या रस्त्यावर धावणार आहेत.

शहर बस ताफ्यातील डिझेलवर धावणाऱ्या बसेसची संख्या कमी करून पर्यावरण पुरक अशा विद्युत बसेस चालविण्याचे धोरण महानगरपालिकेने स्वीकारले आहे. मनपाने मे. इव्ही ट्रान्स प्रा. लिमिटेडशी करार केला आहे. त्यानुसार कंपनीने २०२१ ते नोव्हेंबर २०२२ पर्यंत ४० इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा केला आहे. याशिवाय नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने १५ इलेक्ट्रिक मीडी बसेस मनपाला दिलेल्या आहेत.

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून वातानुकूलित १४३ बसेस खरेदी करण्याचा करारनामा डिसेंबर २०२२ मध्ये पीएमआय या विद्युत बसेस निर्मिती करणार्या कंपनीशी करण्यात आला होता. त्यानुसार या एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत २४ इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर धावणार आहेत, अशी माहिती मनपाचे परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी दिली.

- वाठोडा येथे चार्जिंग स्टेशन

वाठोडा येथील १० एकर विस्तीर्ण भूखंडावर अद्यावत चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे. परिणामी शहर बस ताफ्यात या वर्षाच्या अखेरपर्यंत २३० विद्युतभारित परिवहन बसेसची भर पडणार आहे. ८ ठिकाणी चार्जिंग स्टेशन राहतील. एक बस चार्ज होण्यासाठी २ तासांचा वेळ लागेल. एकदा चार्ज झाल्यानंतर बस साधारण ३०० किमी धावेल.





  Print






News - Nagpur




Related Photos