अबुजमाडमधील चकमकीत ३ माओवादी ठार C-60 जवान दिपक मडावी यांना वीरमरण, एक जवान जखमी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : अबुजमाड परिसरात सुरू असलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले असून चकमकीत तीन माओवादी ठार झाले आहेत. सदर घटनास्थळावरून आज सकाळी आणखी दोन माओवादी (एक पुरुष व एक महिला) यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले. यापूर्वी एक माओवादी ठार झाला होता. आतापर्यंत एकूण ३ माओवादी (२ पुरुष व १ महिला) यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले असून त्यांच्याकडून १ एके-४७ आणि १ एसएलआर ही शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ठार झालेल्या माओवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.
या अभियानादरम्यान सी-६० पथकातील जवान दिपक चिन्ना मडावी (वय ३८), सध्या राहणार अहेरी व मूळ राहणार मांड्रा, दामरांचा, तालुका अहेरी हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना आज पहाटे अबुजमाड येथील घनदाट जंगलातून हेलिकॉप्टरच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालय, भामरागड येथे आणण्यात आले. मात्र, अभियानादरम्यान झालेल्या गंभीर जखमांमुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून त्यांनी कर्तव्य बजावताना वीरमरण पत्करले आहे.
याच चकमकीदरम्यान सी-६० पथकातील आणखी एक जवान जोगा मडावी, रा. किष्टयापल्ली हे गोळी लागून जखमी झाले होते. त्यांनाही हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षितरित्या बाहेर काढून भामरागड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील उपचारांसाठी त्यांना लवकरच हेलिकॉप्टरद्वारे गडचिरोली येथे हलविण्यात येणार आहे.
दरम्यान, अबुजमाडच्या जंगल परिसरात शोध मोहीम अद्याप सुरू असून परिसरात माओवादी हालचालींची शक्यता लक्षात घेता सुरक्षा दलांकडून सतर्कता वाढविण्यात आली आहे. या संदर्भातील पुढील माहिती गडचिरोली पोलीसांकडून वेळोवेळी देण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




